पुणे : बदलत्या हवामानामुळे आणि वाढत्या प्रदूषणामुळे सर्दी-खोकल्याचे प्रमाण वाढले असले तरी, अनेक वेळा ही लक्षणे सामान्य नसून दम्याची (अस्थमा) सुरुवात असू शकते, असा इशारा अपोलो स्पेक्ट्रा रूग्णालयाचे इंटरनल मेडिसिन एक्सपर्ट डॉ. सम्राट शहा यांनी दिला आहे. जागतिक दमा दिवस याबद्दल बोलताना त्यांनी सांगितले की, दर महिन्याला खोकल्याच्या तक्रारीसाठी येणाऱ्या १० रुग्णांपैकी सुमारे ४ ते ५ रुग्णांना दमा असल्याचे निदान होते.
दम्याच्या रुग्णांना खोकल्याची समस्या नेहमीच असू शकते आणि ही समस्या विशेषतः रात्रीच्या वेळी, हसताना आणि कधीकधी व्यायाम करताना वाढते. दम्यामध्ये रुग्णाला छातीत घट्टपणा जाणवतो. दम्यामध्ये छाती जड झाल्यामुळे रुग्णांना श्वास घेण्यास त्रास होतो. अनेकदा शारीरिक काम करताना ही समस्या वाढू शकते. उपचारांविना दम्याच्या लक्षणांकडे दुर्लक्ष केले तर त्याचा त्रास आणखी वाढू शकतो. अशा व्यक्तींना सतत दमल्यासारखं वाटतं, घरी, शाळेत नीट अभ्यास करता येत नाही, शाळा किंवा कामाच्या ठिकाणी योग्य काम करता येत नाही. काही लोकांमध्ये फुप्फुसापर्यंत संसर्ग होण्याचा धोका असतो.
दम्याचे निदान स्पायरोमीट्री, पिक-फ्लो मीटर टेस्ट, आणि इतर श्वसन चाचण्यांद्वारे करता येते. घरात पूर्वी एखाद्या व्यक्तीला अस्थमा असेल, तर कुटुंबातील इतर सदस्यांना होण्याची शक्यता अधिक असते. धूळ, धूर, तंबाखू, अगरबत्तीचा धूर यांपासून दम्याच्या रुग्णांनी दूर राहावे, अशी तज्ज्ञांनी सूचना केली आहे. दम्याच्या लक्षणांकडे दुर्लक्ष न करता वेळेवर तपासणी आणि उपचार करणे अत्यंत गरजेचे आहे.
दमा असलेल्यांनी ही काळजी घ्यावी
बहुतेक लोकांना सर्दी किंवा ब्राँकायटिसमध्ये कफ किंवा कोरडा खोकला येतो. परंतु, ते देखील दम्याचे लक्षण देखील असू शकते. ज्या गोष्टींमुळे दमा वाढू शकतो, त्या गोष्टींपासून दमारुग्णांनी दूर राहणे अत्यावश्यक आहे. दमाग्रस्त व्यक्तींनी कुठल्याही प्रकारच्या धुळीपासून, धुरापासून अगदी उदबत्तीच्या धुरापासूनही दूर राहणे गरजेचे आहे. याशिवाय त्यांनी तंबाखूचे सेवन व धूम्रपान प्रकर्षाने टाळले पाहिजे, असेही डॉ. सम्राट म्हणाले.
शहरातील धुळीमुळे दम्याच्या रुग्णांमध्ये वाढ
पुण्यात मागील काही वर्षांपासून रस्ते व बांधकामांमुळे हवेतील धुळीचे प्रमाण वाढले असून, त्यामुळे अॅलर्जी आणि दम्याचे प्रमाण गेल्या काही वर्षांत ४०% नी वाढले आहे. डॉ. शहा म्हणाले की, दीर्घकाळ खोकला होणे, घशातून खरखर आवाज येणे, छाती भरून जाणे ही लक्षणे दिसताच तातडीने डॉक्टरांचा सल्ला घेणे आवश्यक आहे.
लक्षणे दिसताच डॉक्टरांचा सल्ला घ्या
“वारंवार होणारी सर्दी, शिंका येणे, घशातून खरखर आवाज येणे, तसेच वातावरण बदलल्यावर सर्दी-खोकला होणे. ही लक्षणे आढळून आली तर तातडीने डॉक्टरांकडे जाणे आवश्यक आहे.”