आतड्यांमध्ये वाढलेली उष्णता कमी करण्यासाठी आहारात करा 'या' पदार्थांचे सेवन
वाढत्या उष्णतेचा परिणाम आरोग्यासह त्वचा, केस आणि शरीरातील सर्वच अयवयांवर लगेच दिसून येतो. त्यामुळे उन्हाळा वाढल्यानंतर आरोग्याची जास्त काळजी घेणे आवश्यक आहे. उन्हाचा पारा वाढल्यानंतर अंगातून घामाच्या धारा वाहू लागतात. यामुळे शरीरात पाण्याची कमतरता निर्माण होते. शरीरात निर्माण झालेली पाण्याची कमतरता भरून काढण्यासाठी आहारात थंड पदार्थांचे सेवन करावे. उष्णता वाढल्यानंतर अपचनाची समस्या, खराब पचनक्रिया, शरीरातील पाण्याची कमतरता, निर्जलीकरण, तणाव इत्यादी अनेक समस्या उद्भवण्याची शक्यता असते. उन्हाळ्यात पचनक्रिया बिघडण्यासोबतच आतड्यांच्या आरोग्याला सुद्धा हानी पोहचण्याची शक्यता असते. आतड्यांमध्ये उष्णता वाढल्यानंतर आम्ल्पित्त, अपचन, शरीरात होणारी जळजळ, बद्धकोष्ठता इत्यादी अनेक समस्या वाढू लागतात.(फोटो सौजन्य – iStock)
आतड्यांमध्ये वाढलेली उष्णता पचनक्रियेवर गंभीर परिणाम करते. यामुळे पोटात उष्णतेचे प्रमाण वाढून शरीराच्या कार्यात अडथळे निर्माण होतात. शरीराच्या कार्यात अडथळे निर्माण झाल्यानंतर विषारी पदार्थ शरीरात तसेच साचून राहतात, ज्यामुळे आरोग्याला हानी पोहचते. म्हणूनच आज आम्ही तुम्हाला आतड्यांमध्ये वाढलेली उष्णता कमी करण्यासाठी आहारात कोणत्या पदार्थांचे सेवन करावे, याबद्दल सविस्तर माहिती सांगणार आहोत. चला तर जाणून घ्या.
आरोग्यासंबंधित अनेक आजारांवर नारळ पाणी अतिशय पौष्टिक आहे. नारळ पाण्यात असलेले घटक शरीराला ऊर्जा देतात. याशिवाय उष्णतेमुळे पोटात वाढलेली जळजळ कमी करण्यासाठी नियमित किंवा आठवड्यातून दोनदा नारळ पाण्याचे सेवन करावे. यामध्ये असलेले इलेक्ट्रोलाइट शरीरात वाढलेला दाह कमी करण्यासाठी मदत करतात. यामुळे पचनक्रिया सुद्धा सुधारते. नारळ पाण्यात पोटॅशियम आणि मॅग्नेशियम इत्यादी अनेक घटक आढळून येतात.
शरीरात वाढलेली उष्णता कमी करण्यासाठी नियमित बडीशेपच्या पाण्याचे सेवन करावे. या पाण्याच्या सेवनामुळे शरीराला अनेक फायदे होतात. बडीशेपचे पाणी तयार करण्यासाठी एक ग्लास पाण्यात अर्धा चमचा बडीशेप रात्रभर भिजत ठेवा. त्यानंतर सकाळी उपाशी पोटी पाण्याचे सेवन करा. यामुळे पोटात आणि आतड्यांमध्ये वाढलेली उष्णता कमी होईल आणि शरीराला अनेक फायदे होतील.
उन्हाळ्याच्या दिवसांमध्ये ताक प्यायल्यामुळे आरोग्याला अनेक फायदे होतात. ताक बनवताना त्यात काळे मीठ आणि पुदिन्याची पाने टाकून प्यायल्यास शरीरात वाढलेली उष्णता कमी होईल आणि पचनक्रिया सुधारेल. आतड्यांचे कार्य सुधारण्यासाठी आणि उष्णता कमी करण्यासाठी नियमित ताक प्यावे. शरीरात साचून राहिलेले विषारी घटक बाहेर काढून टाकण्यासाठी नियमित ताकाचे सेवन करावे.