
लग्नात चेहऱ्यावर ग्लो दिसण्यासाठी टिप्स (फोटो सौजन्य - iStock)
तुमचा लग्नाचा दिवस तुमच्या आयुष्यातील सर्वात अविस्मरणीय दिवसांपैकी एक असून या दिवशी आपण सुंदर दिसावे असे प्रत्येकालाच वाटते. अनेक वधू आणि वर पोशाख, मेकअप आणि केशरचनांमध्ये मोठी गुंतवणूक करतात, परंतु त्वचेच्या आरोग्य मात्र फारसे लक्ष दिले जात नाही. प्री वेडिंग फोटो शुट आणि उन्हात जास्त वेळ घालवल्याने, टॅनिंग आणि सूर्याच्या अतिनील किरणांमुळे होणारे नुकसान हा एक चिंतेचा विषय ठरु शकतो. यासाठी कोणते उपचार करावे, काय टाळावे आणि तुमच्या त्वचेचे संरक्षण कसे करावे, Skin Care रूटीन कसे असावे यासाठी डॉ. शरीफा चौसे, त्वचारोग तज्ज्ञ, मुंबई यांनी खास टिप्स दिल्या आहेत.
लग्नापूर्वी कशी घ्याल त्वचेची काळजी
हायड्रेशन राखण्यासाठी आणि कोरडेपणा टाळण्यासाठी दररोज मॉइश्चराइज करणे आवश्यक आहे. डॉक्टरांच्या सल्ल्याने मॉइश्चरायझरचा वापर करा. ढगाळ वातावरणात किंवा थोड्या वेळीकरिता जरी बाहेर जायचे असले तरी देखील सनस्क्रीनचा वापर वापरणे गरजेचे आहे. एसपीएफ 50 सनस्क्रीनचा वापर करुन आठवड्यातून एकदा किंवा दोनदा एक्सफोलिएट करा. ज्यामुळे त्वचेच्या मृत पेशी काढून टाकता येतात.
काय कराल उपचार
केमिकल पील्स हा एक चांगला पर्याय असू शकतो. ठराविक पील्स त्वचेला उजळ करु शकतात, त्वचेतील रंगद्रव्य कमी करू शकतात आणि त्वचेची पोत सुधारू शकतात. त्वचेचा लालसरपणा किंवा जळजळ टाळण्यासाठी लग्नापूर्वी पील्स शक्यतो टाळा. शिवाय हायड्राफेशियल बहुतेक त्वचेच्या प्रकारांसाठी सुरक्षित आहे; हे उपचार चेहऱ्यावर त्वरित चमक निर्माण करतात, त्वचा स्वच्छ करते, एक्सफोलिएट करते आणि तुमची त्वचा हायड्रेट करते.
तुमची त्वचा तजेलदार आणि नितळ दिसू लागते. त्याचप्रमाणे त्ववरील मुरुमाचे डाग, काळपटपणा आणि सन स्पॉट्स दूर करण्यात मदत करते. योग्य परिणामांसाठी लग्नाच्या किमान 3 ते 4 आठवडे त्वचा विकार तज्ज्ञांच्या सल्ल्याने योग्य उवचार करा. तज्ञाच्या मार्गदर्शनाखाली प्रक्रिया करा आणि कोणतीही प्रक्रिया करण्यापूर्वी तज्ञांचा सल्ला घ्या आणि तुमच्या शंका दूर करा.
लग्नापूर्वी काय करणे टाळावे?
त्वचा हायड्रेटेड ठेवा, सौम्य क्लींजर्सचा वापर करा आणि बाहेर पडण्यापूर्वी सनस्क्रीनचा वापर करा. चांगल्या दर्जाच्या मेकअप उत्पादनांचा वापर करा. सूर्यप्रकाशात जास्त जाऊ नका; टॅनिंगमुळे त्वचेचा रंग असमान होऊ शकतो. सनस्क्रीन लावायला अजिबात विसरू नका. पुरेशी झोप घ्या जेणेकरुन तुम्ही दिवसभर फ्रेश रहाल आणि डोळ्याखाली काळी वर्तुळं येणार नाहीत. लग्नासाठी त्वचा चमकदार आणि निरोगी दिसावी यासाठी तज्ज्ञांच्या सल्ल्याने विशेष काळजी घ्या.