फोटो सौजन्य - Social Media
जेवणाची रंगात वाढवण्याची मिठाची गरज लागते. पण फक्त जेवणच नाही तर आपल्या सौंदर्याची रंगात वाढवण्यासाठीही मीठ फार मोठी कामगिरी बजावतो. असे म्हणतात की, अंघोळीच्या अगोदर शरीरावर मीठ चोळल्यास आणि अंघोळ केल्यास आपल्या त्वचेला त्याचा फार फायदा होतो. पण खरंच असे आहे का? की ही निव्वळ एक अफवा? चला तर मग जाणून घेऊयतात, या लेखामध्ये:
काही तज्ज्ञ मंडळींचा असा दावा आहे की अंघोळीपूर्वी शरीरावर मीठ चोळल्यास त्वचेला अनेक प्रकारे फायदा होतो. हे केवळ पारंपरिक ज्ञान नसून, आधुनिक त्वचारोगतज्ज्ञ देखील याला पुष्टी देतात. त्यांच्या मते, मीठ हे एक नैसर्गिक स्क्रब म्हणून कार्य करते. त्यामुळे त्वचेवर साचलेली मृत त्वचा म्हणजेच डेड स्किन सहजपणे निघून जाते, त्वचा स्वच्छ, मृदू आणि उजळ वाटते. मीठ चोळण्यामुळे त्वचेकडे रक्तप्रवाह वाढतो, ज्यामुळे त्वचेला पोषण मिळते आणि स्किन टोनमध्ये नैसर्गिक चमक निर्माण होते. यामुळे त्वचेचा थकवा दूर होतो आणि चेहऱ्यावर ताजेपणा येतो. तसेच, मीठ त्वचेच्या छिद्रांमधील घाण, प्रदूषण, घाम आणि विषारी घटक बाहेर काढण्याचे कार्य करते, ज्यामुळे डिटॉक्सिफिकेशन होण्यास मदत होते. या प्रक्रियेमुळे त्वचेचा तणावही कमी होतो, विशेषतः जेव्हा मीठात थोडेसे आवश्यक तेल मिसळून त्याचा वापर केला जातो.
परंतु, या उपायांचा वापर करताना काही मर्यादा पाळणे देखील तितकेच महत्त्वाचे आहे. कारण मीठ हे नैसर्गिक असले तरी त्यामध्ये दाटपणा आणि तीव्रता असते. त्वचेला सूज, जळजळ किंवा जखमा असतील, तर अशावेळी मीठ लावल्यास तीव्र वेदना आणि त्रास होऊ शकतो. काही वेळा यामुळे त्वचेवर जळजळीत प्रतिक्रिया येऊ शकते. त्यामुळे अशा परिस्थितीत मीठ चोळणे टाळावे. तसेच, अत्याधिक प्रमाणात मीठ रगडल्यास त्वचा कोरडी, खवखवलेली आणि त्रासदायक होऊ शकते. विशेषतः ज्या व्यक्तींची त्वचा आधीपासूनच कोरडी किंवा संवेदनशील आहे, त्यांनी मीठ चोळण्यापूर्वी त्वचारोगतज्ज्ञांचा सल्ला घ्यावा किंवा या प्रक्रियेत मॉइस्चरायझिंग तेलांचा वापर करावा.
सर्वसाधारणतः आठवड्यातून एकदाच मीठ स्क्रबिंग करणे पुरेसे असते. त्यातही जर मीठासोबत एखादे मॉइस्चराइजिंग तेल, जसे की नारळ तेल, ऑलिव्ह ऑइल किंवा बदाम तेल मिसळले, तर त्वचेवर हानिकारक परिणाम होण्याची शक्यता कमी होते आणि त्वचेला पोषण मिळते. त्यामुळे मीठ चोळणे हा एक फायदेशीर सौंदर्यउपाय आहे, पण तो विवेकाने, योग्य प्रमाणात आणि काळजीपूर्वक वापरणे आवश्यक आहे.