मेंदूसंबंधित गंभीर आजार झाल्यानंतर शरीरात दिसून येतात 'ही' गंभीर लक्षणे
दैनंदिन जीवन जगताना कोणत्याही व्यक्तीला आरोग्यासंबंधित अतिशय घातक किंवा सामान्य समस्या उद्भवू शकते. या समस्या उद्भवण्याआधी शरीरात सुरुवातीच्या दिवसांमध्ये काही सामान्य लक्षणे दिसू लागतात. या लक्षणांकडे बऱ्याचदा दुर्लक्ष केले जाते. मात्र वारंवार शरीरात दिसणाऱ्या लक्षणांकडे दुर्लक्ष केल्यामुळे आरोग्याला हानी पोहचते. यामध्ये मेंदूसंबंधित आजार उद्भवल्यानंतर शरीराची जास्त काळजी घेणे गरजेचे आहे. मेंदूसंबंधित आजारांमध्ये उद्भवणारा सगळ्यात गंभीर आजार म्हणजे एपिलेप्सी. एपिलेप्सी हा आजार मानसिक आजार कोणत्याही व्यक्तीला होऊ शकतो. या आजाराची लागण लहान मुलांसह तरुण वयातील मुलांना जास्त प्रमाणात होते.
एपिलेप्सी हा मेंदूसंबंधित आजार झालेल्या व्यक्तीला वारंवार झटके येऊ लागतात. काहीवेळा हे झटके अतिशय तीव्र असतात. एपिलेप्सीझालेली व्यक्ती कोणत्याही क्षणी पडून जखमी होऊ शकते. त्यामुळे मेंदूसंबंधित उद्भवणाऱ्या एपिलेप्सी या आजाराची जागतिक स्थरावर लोकांमध्ये जागरूकता वाढवण्यासाठी 26 मार्चला संपूर्ण जगभरात जागतिक पर्पल डे साजरा केला जातो. आज आम्ही तुम्हाला एपिलेप्सी म्हणजे काय? हा आजार झाल्यानंतर शरीरात कोणती लक्षणे दिसतात? या आजारावर नेमके काय उपचार आहेत? याबद्दल सविस्तर माहिती सांगणार आहोत.
मेंदू किंवा मज्जासंस्थे संबंधित आजाराने त्रस्त असलेल्या रुग्णांना एपिलेप्सी हा आजार होऊ शकतो. या आजाराची लागण झाल्यानंतर एपिलेप्टिक झटके येऊ लागतात. हा आजार होण्याचे कोणतेही ठराविक वय नाही. मेंदूमध्ये एका किंवा अधिक भागांमध्ये असामान्य विद्युत पेशींमध्ये असामान्य स्फोट झाल्यामुळे एपिलेप्टिक झटके येतात. यामुळे मेंदूच्या कार्यात अनेक अडथळे निर्माण होण्याची शक्यता असते.
एपिलेप्सीसारख्या गंभीर आजाराने त्रस्त असलेल्या रुग्णांनी एपिलेप्टिक झटके आल्यानंतर घाबरून न जाता स्वतःच्या आरोग्याची काळजी घ्यावी. एपिलेप्टिक झटका आल्यानंतर शांत राहावे. गळ्याभोवती किंवा शरीरावर घातलेले घट्ट कपडे काढून श्वास घेता येईल असे कपडे परिधान करावे. याशिवाय झोपल्यानंतर डोक्याच्या खाली मऊ उशी किंवा कापड ठेवावे. एपिलेप्टिक झटका आलेल्या व्यक्तीला कोणताही पदार्थ खाण्यास किंवा पिण्यास देऊ नये. त्यानंतर तातडीने डॉक्टरांच्या सल्ल्याने योग्य ते औषध उपचार करून आरोग्याची काळजी घ्यावी.