फोटो सौजन्य: iStock
आपल्या सर्वांनाच फिरायला खूप आवडत असते आणि फिरणं म्हंटलं की हॉटेल बुकिंग आलेच. मात्र, ग्राहक हॉटेलमधील रूम्सच्या गोष्टी घरी घेऊन जातात. काही प्रसंगी अशा गोष्टी नेल्याने ग्राहकांना दंड देखील भरावा लागतो.
खरतर, जेव्हा तुम्ही हॉटेलमध्ये राहता तेव्हा तुम्हाला अनेक प्रकारच्या सुविधा मिळतात. या सुविधा तुमच्या खोलीच्या चार्जेसवर आणि हॉटेलवर अवलंबून असते, परंतु सहसा तुम्हाला प्रत्येक हॉटेलमध्ये काही मूलभूत गोष्टी (मोफत हॉटेल सुविधा) मिळतात. मात्र, तुम्हाला माहिती आहे का की हॉटेल रूम्समधील काही गोष्टी तुम्ही बिनधास्त घरी घेऊन जाऊ शकता. तसेच यासाठी तुम्हाला कोणत्याही प्रकारचे शुल्क देखील द्यावे लागणार नाही. चला जाणून घेऊयात की हॉटेलच्या खोलीतून तुम्ही कोणत्या गोष्टी मोफत घेऊन जाऊ शकता.
हॉटेलच्या खोल्यांमध्ये सहसा लहान बाटल्यांमध्ये शॅम्पू, कंडिशनर, बॉडी लोशन, टूथब्रश, हँड सोप आणि इतर प्रसाधनसामग्री म्हणजेच टॉयलेटरीज असतात. तुमचा मुक्काम आरामदायी करण्यासाठी या गोष्टी दिल्या जातात. या प्रसाधनसामग्री तुम्ही घरी घेऊन जाऊ शकतात.
बहुतेक हॉटेल्समध्ये मिनी-बारमध्ये किंवा ट्रेमध्ये मोफत चहा-कॉफीचे पॅकेट आणि साखर, क्रिमर इत्यादी मसाले असतात. जर तुम्ही त्यांचा वापर केला नसेल, तर ते तुमच्यासोबत नेण्यास काहीच हरकत नाही. प्रवासादरम्यान किंवा ऑफिसमध्ये हे पॅकेट उपयुक्त ठरू शकतात.
हॉटेल्स अनेकदा त्यांचे ब्रँडेड नोटपॅड, पेन किंवा पेन्सिल पाहुण्यांसाठी ठेवतात. तुम्ही ते तुमच्यासोबत न डगमगता घेऊन जाऊ शकता. या स्टेशनरीच्या वस्तू लहान असतात, परंतु नंतर तुमच्यासाठी त्या उपयुक्त ठरू शकतात.
अनेक आलिशान हॉटेल्स पाहुण्यांना आरामासाठी डिस्पोजेबल चप्पल देतात. जर तुम्ही त्या घातल्या नसतील तर त्या घरी नेल्या तरी चालतील. विमानतळावर, हॉस्पिटलमध्ये किंवा घरी पाहुण्यांसाठी या चप्पल उपयुक्त ठरू शकतात.
काही हॉटेल्स खोलीत शू पॉलिशिंग किट किंवा एक लहान शिलाई किट ठेवतात, ज्यामध्ये धागा, सुई आणि बटणे असू शकतात. जर तुम्हाला ही किट मिळाली आणि तुम्ही ती वापरली नसेल, तर ती सोबत नेण्यास काहीच हरकत नाही.
ज्याप्रमाणे हॉटेल रूम्समधील काही गोष्टी तुम्ही घरी घेऊन जाऊ शकता. त्याचप्रमाणे अशा काही गोष्टी आहेत ज्या तुम्ही तुमच्यासोबत अजिबात घेऊ शकत नाही. जसे की हेअर ड्रायर, पेंटिंग्ज, उशीचे कव्हर, पडदे, दिवे, घड्याळे, ड्रेसिंग गाऊन इ. या गोष्टी हॉटेलची मालमत्ता आहेत आणि तुम्ही त्या फक्त वापरू शकता, तुम्ही त्या तुमच्यासोबत नेऊ शकत नाही.