चेहऱ्यावर आलेल्या पांढऱ्या डागांना सतत खाज येते? मग 'हे' उपाय करून लगेच मिळवा आराम
वातावरणात होणारे बदल, कामाचा वाढलेला तणाव, पोषक घटकांची कमतरता, चुकीचे स्किन केअर, तिखट तेलकट पदार्थांच्या अतिसेवनाचा परिणाम आरोग्यासोबतच त्वचेवर सुद्धा लगेच दिसून येतो. त्वचा अधिक सुकल्यासारखी आणि निस्तेज वाटू लागते. त्वचेची गुणवत्ता खराब झाल्यानंतर ती सुधारण्यासाठी अनेक वेगवेगळे उपाय केले जातात. चेहऱ्यावर वाढलेले पिंपल्स, मुरूम हळूहळू कमी होऊन जातात,. मात्र त्वचेवर पांढरे डाग तसेच राहतात. चेहऱ्यावर पांढरे डाग राहिल्यामुळे त्वचा अधिकच निस्तेज आणि कोरडी पडून जाते. चेहऱ्यावर आलेल्या पांढऱ्या डागांमुळे त्वचेला सतत खाज येते. सतत खाज आल्यामुळे चेहऱ्यावर लालसरपणा वाढू लागतो. ही समस्या काहीवेळा ऍलर्जी किंवा बुरशीजन्य संसर्गामुळे होण्याची शक्यता असते. चेहऱ्यावर येणारे पांढरे डाग बऱ्याचदा वाढू लागल्यानंतर त्वचेसंबंधित इतरही समस्या उद्भवतात.(फोटो सौजन्य – istock)
उन्हाळ्यासह इतर सर्वच ऋतूंमध्ये त्वचेसंबंधित समस्या उद्भवू लागतात. तसेच थंडीच्या दिवसांमध्ये त्वचा अतिशय कोरडी पडते. त्वचेमध्ये वाढलेल्या कोरडेपणामुळे चेहऱ्यावर पांढरे डाग येतात. याशिवाय त्वचा स्वच्छ करण्यासाठी चुकीच्या साबणाचा वापर केल्यास त्वचेमधील नैसर्गिक तेल कमी होऊन जाते. तसेच सतत फेसवॉश किंवा साबणाचा वापर करून त्वचा स्वच्छ करू नये. शरीरात कॅल्शियम किंवा विटामिन बी १२ ची कमतरता निर्माण झाल्यानंतर चेहऱ्यावर पांढरे डाग येऊ लागतात. म्हणूनच आज आम्ही तुम्हाला चेहऱ्यावर आलेले पांढरे डाग कमी करण्यासाठी काही घरगुती उपाय सांगणार आहोत. हे उपाय केल्यामुळे त्वचा पांढरे डाग कमी होण्यासोबतच त्वचा अतिशय सुंदर दिसेल.
त्वचेवर वाढलेले पांढरे डाग कमी करण्यासाठी गुलाब पाणी आणि काकडीचा रस नियमित चेहऱ्यावर लावावा. यामुळे त्वचेमध्ये वाढलेली उष्णता कमी होईल आणि त्वचा थंड राहील. त्वचेमधील ओलावा कायम टिकून ठेवण्यासाठी आणि त्वचा हायड्रेट ठेवण्यासाठी काकडी,गुलाब पाणी अतिशय प्रभावी ठरते.
खोबरेल तेल, बदाम तेल किंवा ऑलिव्ह ऑइल वाटीमध्ये मिक्स करून घ्या. तयार केलेले तेलाचे मिश्रण संपूर्ण चेहऱ्यावर लावून हलक्या हाताने मसाज करून घ्या. यामुळे चेहऱ्यावरील कोरडेपणा कमी होईल आणि त्वचा उजळदार दिसेल.
वाटीमध्ये ताजी हळद आणि दूध मिक्स करून लेप तयार करावा. तयार केलेला लेप चेहऱ्यावर लावून काहीवेळ तसाच ठेवून द्या. त्यानंतर पाण्याने त्वचा स्वच्छ करा.
तुमच्या चेहऱ्यावर वारंवार खाज येत असेल तर कोरफडीच्या रसाचा गर संपूर्ण चेहऱ्यावर लावून हलक्या हाताने मसाज करावा. यामुळे डाग हळूहळू कमी होण्यास मदत होईल.
दीर्घकाळ त्वचा तरुण आणि चमकदार ठेवण्यासाठी आहारात हिरव्या भाज्या, फळे, सुका मेवा व दूध इत्यादी पदार्थांचे सेवन करावे. या पदार्थांच्या सेवनामुळे शरीराला योग्य ते पोषण मिळते आणि त्वचा सुंदर होते. खाज किंवा लालसरपणा वाढू लागल्यास वरील उपाय केल्यास त्वचेवर वाढलेले डाग कमी होण्यास मदत होईल.