महिलांमध्ये का वाढत आहे कॅल्शियमची कमतरता? शरीरात दिसून येणाऱ्या 'या' लक्षणांकडे चुकूनही करू नका दुर्लक्ष
दिवसभर कामाच्या धावपळीमध्ये महिला स्वतःच्या आरोग्याकडे व्यवस्थित लक्ष देत नाहीत. सतत काम, नातेसंबंध, मानसिक तणाव, आहारात होणारे बदल इत्यादी अनेक गोष्टींचा परिणाम आरोग्यावर लगेच दिसून येतो. त्यामुळे महिलांनी स्वतःच्या आरोग्याची जास्त काळजी घ्यावी. याशिवाय घरातली काम, साफसफाई, मुलांच्या शाळा, स्वत:च काम, कामासाठी प्रवास इत्यादी गोष्टींमुळे महिलांची खूप जास्त दमछाक होते. वय वाढल्यानंतर महिलांमध्ये अनेक समस्या उद्भवतात. मासिक पाळीच्या समस्या, हाडांमध्ये वाढलेल्या वेदना, कंबर दुखणे, गुडघे दुखणे इत्यादी अनेक समस्या उद्भवू लागतात. त्यामुळे आरोग्याची जास्त काळजी घेणे आवश्यक आहे. शरीरात कॅल्शियमची कमतरता निर्माण झाल्यानंतर संपूर्ण आरोग्यावर बिघडून जाते. हृदयाची धडधड, स्नायूं दुखणे, नर्व्ह सिग्नल्स आणि रक्तात गाठी तयार होणे इत्यादी शरीराच्या महत्वपूर्ण कार्यांसाठी कॅल्शियम आवश्यक आहे. म्हणूनच आज आम्ही तुम्हाला कॅल्शियमची कमतरता निर्माण झाल्यानंतर शरीरात कोणती लक्षणे दिसून येतात, याबद्दल सविस्तर माहिती सांगणार आहोत.(फोटो सौजन्य – istock)
शरीरासाठी कॅल्शियम अतिशय महत्वाचे आहे. पण कोणत्याही वयात कॅल्शियमची कमतरता निर्माण झाल्यानंतर हाडे दुखणे, हाडांची झीज होणे, स्नायूंमध्ये वेदना होणे इत्यादी अनेक समस्या उद्भवू लागतात. सांध्यांमधील लवचिकता कमी झाल्यानंतर वेदना वाढतात, ज्यामुळे दैनंदिन जीवनातील कामे करताना अनेक अडथळे निर्माण होतात.
कॅल्शियमची कमतरता निर्माण झाल्यानंतर रात्री झोपल्यावर हातापायांवर सतत मुंग्या येतात. कॅल्शियम नर्व्ह सिग्नलसाठी अतिशय महत्वाचे आहे. त्यामुळे कॅल्शियम कमी झाल्यानंतर अचानक कोणत्याही वेळी हातापायांमध्ये झिणझिण्या येणे, अचानक सुन्नपणा जाणवणे इत्यादी गंभीर लक्षणे शरीरात दिसतात.
कोणत्याही वयात शरीरातील कॅल्शियम कमी होऊ शकते. बऱ्याचदा शरीरात वाढलेल्या अशक्तपणा आणि थकव्याकडे दुर्लक्ष केले जाते. पण असे न करता तातडीने डॉक्टरांचा सल्ला घेऊन योग्य ते औषध उपचार करावे. त्वचा कोरडी होणे, केस गळणे आणि नखं तुटणे इत्यादी समस्या कॅल्शियमच्या कमतरतेमुळे उद्भवतात. कॅल्शियमच्या कमतरतेमुळे दातांमध्ये सुद्धा वेदना वाढतात.
कॅल्शियमच्या कमतरतेची लक्षणे काय आहेत?
स्नायू आखडणे आणि बधिरपणा, थकवा आणि अशक्तपणा, हृदयाचे ठोके अनियमित होणे, मेंदूच्या कार्यावर परिणाम, जसे की गोंधळ आणि स्मरणशक्ती कमी होणे, त्वचा कोरडी होणे, खाज सुटणे किंवा एक्झिमासारखी लक्षणे, नखे ठिसूळ आणि कमकुवत होणे.
कॅल्शियमच्या कमतरतेची कारणे काय आहेत?
आहारात पुरेसे कॅल्शियम नसणे, कॅफिन किंवा अल्कोहोलचे जास्त सेवन, बैठी जीवनशैली किंवा सूर्यप्रकाशाचा अभाव (व्हिटॅमिन डी कमी होणे) गर्भधारणा, स्तनपान आणि रजोनिवृत्ती यासारख्या अवस्थांमध्ये कॅल्शियमची जास्त गरज असते.
कॅल्शियमची कमतरता कशी टाळता येते?
कॅल्शियमयुक्त अन्नपदार्थ आहारात समाविष्ट करा, जसे की दूध, दही, हिरव्या पालेभाज्या, आणि अंजीर.