मणक्यांच्या समस्या (फोटो सौजन्य - iStock)
गर्भधारणेदरम्यान होणारे हार्मोनल बदल, वजनवाढ आणि चुकीची बसण्याची पद्धत यामुळे मणक्यावर ताण येतो. प्रसुतीनंतरही चुकीच्या शरीरीक स्थितीत बाळाला स्तनपान देणे, झोपेची कमतरता आणि व्यायामाचा अभाव यामुळे हा त्रास दीर्घकाळापर्यंत टिकू शकतो.
पुण्यातील अपोलो स्पेक्ट्रा रूग्णालयातील ऑर्थोपेडिक आणि स्पाइन सर्जन डॉ. शार्दुल सोमण म्हणाले की, गर्भधारणेदरम्यान आणि नंतर त्यांच्या शरीरात होणाऱ्या बदलांमुळे अनेक नवमातांना पाठदुखी, पोश्चर संबंधी समस्या आणि पाठीच्या कण्यासंबंधी अस्वस्थता जाणवते.गर्भधारणेदरम्यान वाढलेले वजन, हार्मोनल बदल आणि बदललेल्या शारीरीक स्थितीमुळे मणक्यावर अतिरिक्त ताण येतो. प्रसूतीनंतर, बाळाला सतत उचलून घेणे, चुकीच्या स्थितीत व पाठीच्या कण्यास योग्य आधार न घेता स्तनपान करणे आणि पुरेशी विश्रांती न घेणे यासारख्या दैनंदिन समस्यांमुळे देखील ही अस्वस्थता आणखी वाढू शकते.
काय सांगतात तज्ज्ञ
डॉ. सोमण पुढे म्हणाले की, धक्कादायक म्हणजे नव मातांच्या बाबतीत मणक्याच्या समस्यांमध्ये ६०% नी वाढ झाली आहे. दरमहिन्याला २५ ते ३५ वयोगटातील गर्भधारणेनंतर १० पैकी ६ गर्भवती महिलांना पाठदुखीचा त्रास होतो, जो त्यांच्या दिनचर्येत व्यत्यय आणतो. तथापि, गर्भधारणेपूर्वी आणि गर्भधारणेदरम्यान निरोगी जीवनशैली आणि तज्ज्ञांच्या मार्गदर्शनाखाली नियमित व्यायाम केल्यास पाठीच्या कण्यासंबंधी समस्या कमी करण्यास मदत होते.
मणक्याचे वय तुमच्या कल्पनेपेक्षाही वाढतेय जलद, लक्षणांकडे दुर्लक्ष करू नका; डॉक्टरांचा सल्ला
नक्की काय होते समस्या?
पुण्यातील अंकुरा रूग्णालायतील प्रसूती आणि स्त्रीरोग तज्ज्ञ डॉ. प्रसाद कुलट म्हणाले की, गर्भधारणेच्या काळात इस्ट्रोजेन आणि प्रोजेस्टेरॉन या दोन्ही हॉर्मोन्सची तसंच रिलॅक्सिनची पातळी वाढते. हे हॉर्मोन्स सांधे आणि लिगामेंट्सना रिलॅक्स करण्यास आणि प्रसूती सुलभरित्या करण्यास मदत करतात. मात्र या हार्मोनल बदलामुळे महिलांना पाठदुखीसारख्या समस्येला सामोरे जावे लागू शकते. गर्भाच्या वाढत्या वजनामुळे, शरीर पुढच्या दिशेने वाढते. त्यामुळे पाठीच्या खालच्या भागाच्या स्नायूंवर ताण येऊ शकतो आणि गर्भधारणेदरम्यान पाठदुखीचा त्रास वाढू शकतो.
गर्भधारणेत ही समस्या का वाढते
गर्भारपणात वजन वाढल्याने स्नायू, सांधे, पाठ आणि मान यांना नेहमीपेक्षा जास्त काम करावं लागतं. त्यामुळे गरोदरपणाच्या सुरुवातीपासूनच डॉक्टरांच्या निरीक्षणाखाली आणि सल्ल्यानुसार पाठीचे आणि ओटीपोटाचे व्यायाम करावेत, जेणेकरून हे स्नायुंना बळकट होतील. स्नायू मजबूत करण्याचे व्यायाम आणि फिजिओथेरपी या पाठीच्या कण्याच्या समस्यांवर मात करण्यासाठी अतिशय महत्त्वाच्या आहेत.
मणका आणि पाठीच्या कण्याला सूज आली आहे? जाणून घ्या सर्व्हायकल स्पॉन्डिलायसिसची लक्षणे आणि उपाय
महत्त्वाच्या टिप्स
मातांनी वारंवार पुढे वाकणे टाळावे, बाळाला दूध पाजताना आधार देणाऱ्या खुर्च्यांचा वापर करावा आणि हलके स्ट्रेचिंग करावे. आरोग्यदायी वजन राखणे, बाळाची काळजी घेताना मधूनमधून थोडी विश्रांती घेणे आणि पुरेशी झोप घेणे या प्रतिबंधक उपायांमुळे पाठीचा कणा सुरक्षित राहतो. कण्याचा त्रास ‘प्रसूतीनंतरचा सामान्य त्रास’ म्हणून दुर्लक्षित करू नये. वेळेवर डॉक्टरांचा सल्ला घेणे आवश्यक आहे, कारण वेदनेचे वेळीच निदान आणि उपचार केल्यास मातांना पुन्हा हालचालीची क्षमता, आत्मविश्वास आणि वेदनारहित जीवनमान मिळवता येते, असे डॉ. कुलट यांनी स्पष्ट केले