संग्रहित फोटो
वाढत्या वयाची चिन्हे आपल्याच्या चेहऱ्यावर दिसतात. त्यामध्ये चेहऱ्यावर सुरकुत्या पडणे, पांढरे केस होणे, दृष्टी कमी होणे किंवा हालचाली मंदावणे ही काही आहेत. हे झाले डोळ्यांनी दिसणारे पण तुमच्या शरीरातील सर्वात आधी वृद्धत्व दाखवणारा व डोळ्यांनी न दिसणारही भाग आहे हे तुम्हाला माहित आहे का? होय, याचे उत्तर आहे तुमच्या पाठीचा मणका!
मणका अपेक्षेपेक्षा खूप लवकर झिजायला आणि वृद्धत्व दाखवायला लागतो. अनेकदा अगदी तिशीपासूनच. भीतीदायक गोष्ट म्हणजे आपण या सुरुवातीच्या इशाऱ्यांना “सामान्य पाठदुखी” किंवा रोजच्या थकव्याचे लक्षण समजून त्याकडे दुर्लक्ष करतो आणि नंतर समजते की कधीही भरून न येणारे नुकसान आधीच सुरू झाले आहे.
दुर्लक्ष करू नये अशी सूक्ष्म लक्षणे
आधीच दिसतात ज्यामध्ये सकाळी खूप वेळ राहणारा कडकपणा (stiffness), दीर्घकाळ बसल्यावर पुन्हा पुन्हा होणारी मान किंवा पाठदुखी, पुढे वाकताना किंवा वळताना होणारी अडचण, अगदी वारंवार होणारी डोकेदुखी हे सर्व मणक्याच्या झिजलेल्या डिस्क्स किंवा सुरुवातीच्या संधिवाताची (arthritis) लक्षणे असू शकतात.
यामध्ये हात, बोटे किंवा पायात मुंग्या येणे किंवा सुन्नपणा जाणवणे हे नसा दाबल्या गेल्यामुळे (herniated disc किंवा spinal stenosis) होत असते. कायमचा कडकपणा हा कार्टिलेज (ऊतक) आणि लिगामेंट्सच्या (स्नायूबंध) सुरुवातीच्या झिजेचे संकेत असू शकतात. शरीराचा समतोल बिघडणे, जे अनेकदा “पाय कमजोर झाले” किंवा “वय झाले” म्हणून समजले जाते. हे प्रत्यक्षात मणक्याच्या मज्जारज्जूवर (spinal cord) दाब येण्याचे लक्षण असू शकते. ही लक्षणे दुर्लक्षित केली तर नंतर हात-पाय यामधील ताकद कमी होणे, हालचालींवर नियंत्रण गमावणे किंवा स्वतंत्रपणे चालण्यात अडचण येणे असे होऊ शकते.
हे केवळ वयामुळेच नाही तर जीवनशैलीही कारणीभूत असू शकते. वय वाढल्याने मणक्याची लवचिकता कमी होतेच, पण जीवनशैली हा प्रक्रियेचा वेग अनेक पटीने वाढवते. एकाच जागी जास्त वेळ बसून राहणे, चुकीची बसण्याची पद्धत (विशेषतः मोबाईल वा लॅपटॉपकडे तासनतास बघण्यामुळे होणारा ‘टेक नेक सिंड्रोम’), व्यायामाचा अभाव, स्थूलता आणि धूम्रपान हे सर्व मणक्याची झिज घडवून आणतात.
थोडक्यात चुकीच्या जीवनशैलीच्या सवयी असलेला 35 वर्षांच्या तरुणाचा मणका हा 55 वर्षाच्या व्यक्तीच्या मणक्यासारखा वय वाढलेला असू शकतो. त्याला सोप्या प्रतिबंधक उपायांनी मोठा फरक पडू शकतो. यामध्ये योग्य पोश्चर ठेवणे (बसण्याची पद्धत), पोटाच्या स्नायूंची ताकद वाढवणारे व्यायाम करणे, अर्गोनॉमिक व्यायाम करणे आणि योगा किंवा स्ट्रेचिंगसारख्या लवचिकतेच्या क्रिया करणे आवश्यक आहे.
कधी गंभीरतेने घ्यावे?
अगदी वीसाव्या वर्षापासूनच मणक्याच्या आरोग्याकडे लक्ष देणे आवश्यक आहे. चाळीसाव्या वर्षी, जरी व्यक्ती स्वतःला “फिट” समजत असली तरी स्कॅनमध्ये सुरुवातीचे झिजेचे बदल दिसू शकतात. पण काही लक्षणांकडे मात्र कधीही दुर्लक्ष करू नये. यामध्ये हातपायांमध्ये वाढत जाणारी कमजोरी किंवा सुन्नपणा, अचानक मूत्र किंवा मलावरील नियंत्रण जाणे, रात्री वाढणारी तीव्र वेदना आणि पाठदुखीसोबत अनपेक्षित वजन घटणे ही आहेत. ही सर्व लक्षणे मणक्याच्या मज्जारज्जूवर दाब येणे, त्याला होणारा संसर्ग किंवा अगदी ट्यूमर (गाठ) सारख्या गंभीर आजारांची सुरवात असू शकते. त्यासाठी त्वरित वैद्यकीय तपासणी आवश्यक आहे.
मणक्याच्या आरोग्याचे भविष्य काय?
चांगली गोष्ट म्हणजे, आज मणक्यावरील उपचारांमध्ये झपाट्याने प्रगती होत आहे. यामध्ये कमी छेद असणाऱ्या (minimally invasive) शस्त्रक्रिया, हालचाल सहन करू शकतील असे इम्प्लांट्स आणि स्टेम सेल–आधारित डिस्क रिपेअर सारख्या पुनरुत्पादक उपचारांमुळे मणक्याचे आरोग्य पुन्हा सुधारण्याची शक्यता वाढली आहे. “तंत्रज्ञान कितीही प्रगत झाले तरीही, लवकर निदान आणि प्रतिबंध हेच निरोगी मणक्यासाठी सर्वात प्रभावी शस्त्र आहेत.”
– डॉ. पंकज तोतला (कन्सल्टंट न्युरोसर्जन, आदित्य बिर्ला मेमोरियल हॉस्पिटल, पुणे)