पीडित कुटुंबियांना शिवसेनेचा मदतीचा हात, किशोर पाटकर यांनी दिली आर्थिक मदत (फोटो सौजन्य-X)
सिद्धेश प्रधान, नवी मुंबई: सावकारी जाचाला कंटाळून आत्महत्या करणाऱ्या कोपरखैरणे येथील स्व.रवींद्र शिंदे यांच्या परिवाराला शिंदे सेनेच्या वतीने १० लाख रुपये मदतीचा हात देण्यात आला आहे. सदर मदतीमुळे त्या पिडीत कुटुंबाला मोठा दिलासा मिळाला. मदतीचा हात देताच पीडित कुटुंबियांच्या अश्रूंचा बांध फुटला. मात्र जिल्हाप्रमुख किशोर पाटकर यांनी कुटुंबीयांना दिलासा देताना शिवसेना सदैव तुमच्यासोबत असल्याचा दिलासा त्यांना दिला. कुटुंबीयांनी याबाबत जिल्हाप्रमुख किशोर पाटकर यांचे आभार मानले. याप्रसंगी त्यांच्यासोबत महिला शिवसेना जिल्हा प्रमुख शीतल कचरे ,ऋषी पाटील आदी उपस्थित होते. यावेळी खुद्द उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या पत्नींनी पीडित कुटुंबियांशी फोनवरून संवाद साधत कुटुंबीयांचे सांत्वन केले.
कोपरखैरणे सेक्टर १९ येथे राहणारे ३९ वर्षीय रवींद्र शिंदे यांनी प्रथमेश चव्हाण नामक व्यक्तीकडून २५ हजार रुपये व्याजावर घेतले होते. मात्र सदर रक्कम आणि त्या रक्कमेचे व्याज तसेच चक्रवाढ व्याजाची राक्म रवींद्र यांना भरता येत नव्हती. त्यामुळे त्यांना पैसे घेतलेल्या व्यक्तीकडून खडे बोल सुनावले जात होते,आणि सतत पैशांसाठी तगादा लावला जात होता. या त्रासाला वैतागून रवींद्र यांनी गळफास घेऊन आपली जीवनयात्रा संपवली होती. मृत्युसमयी त्यांनी एक चिट्ठी उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या नवे लिहून ठेवली होती. त्यात माझ्या कुटुंबाला सांभाळून घ्या असा भावनीक संदेश लिहिण्यात आला होता. या आत्महत्येची बातमी वर्तमान पत्रातून कळताच शिवसेनेचे बेलापूर विधानसभा क्षेत्राचे जिल्हाप्रमुख किशोर पाटकर यांनी सदर मयत इसमाच्या परिवाराचा शोध घेतला आणि त्यंची पत्नी आणि मुलीला बुधवारी ९ जुलै रोजी दहा लाख रुपयांची मदत सुपूर्द केली.
फक्त २५ हजार रुपयांच्या पायी एक परिवारातील सदस्याला आत्महत्या करावी लागते ही बाब फार निंदनीय आहे. असे प्रकार व्हायला नकोत. अश्या प्रकारास कारणीभूत असणाऱ्या घटकांना कडक शासन व्हयला हवे यासाठी आपण पाठपुरावा करणार आहोत आणि शिवसेना शिंदे परिवारच्या मागे खंबीरपणे उभी राहील अशी भावना यावेळी किशोर पाटकर यांनी व्यक्त केली.
सावकाराच्या चक्रवाढ व्याजाला कंटाळून एकाने आत्महत्या केल्याची घटना कोपरखैरणे येथे समोर आली आहे. आत्महत्येपूर्वी लिहिलेल्या चिठ्ठीत या व्यक्तीने ‘प्लीज, एकनाथ शिंदे साहेब तुमच्याकडे विनंती आहे,’ असे लिहीत या प्रकरणात दोषी सावकारांवर कठोर कारवाई करण्याची मागणी केली आहे. आत्महत्या करणाऱ्याचे नाव रवींद्र शिंदे (वय ३९) असे कोपरखैरणे सेक्टर १९ परिसरातील राहत्या इमारतीच्या छतावर गळफास घेत त्यांनी आत्महत्या केली. सकाळी या घटनेची नोंद केल्यानंतर त्यांचा मृतदेह गावी नेण्यात आला होता. कुटुंबीय गावावरून परत आल्यानंतर त्यांनी सोमवारी पोलिसांकडे याबाबत तक्रार केली.