पुणे : पुण्यातील कसबा पेठ विधानसभा (Kasba Peth Assembly) मतदारसंघाच्या आमदार मुक्ता टिळक (Mukta Tilak) यांचे निधन झाल्यानंतर रिक्त झालेल्या जागेवर पोटनिवडणूक होत आहे. जवळपास सर्वच पक्षातून उमेदवार इच्छुक आहेत. पण महाविकास आघाडीमधील (Mahavikas Aghadi) घटक पक्ष असलेल्या काँग्रेसची (Congress) डोकेदुखी वाढण्याची चिन्हे निर्माण झाली आहेत. या एका जागेसाठी पक्षातील तब्बल 16 उमेदवार इच्छुक आहेत.
भाजपकडे ही जागा असल्याने पोटनिवडणूक बिनविरोध व्हावी, असे भाजपचे प्रयत्न होते. मात्र, आता कसबा विधानसभा मतदारसंघ पोटनिवडणूक बिनविरोध होणार असल्याच्या शक्यता कमीच आहे. सर्वच पक्ष आता दावेदारी सांगत आहेत. कसबा पोटनिवडणुकीसाठी एकट्या काँग्रेस पक्षातून तब्बल 16 उमेदवार इच्छुक आहेत. यासाठी काँग्रेसचे आमदार संग्राम थोपटे यांनी सर्व इच्छुकांच्या मुलाखती घेतल्या आहेत. या सर्व इच्छुकांची नावे काँग्रेस हायकमांडकडे पाठवली जाणार असल्याची माहिती संग्राम थोपटे यांनी दिली.
कोण आहेत इच्छुक?
काँग्रेसचे शहराध्यक्ष अरविंद शिंदे, रविंद्र धंगेकर, बाळासाहेब दाभेकर, कमल व्यवहारे, नीता रजपूत, संगिता तिवारी, विजय तिकोणे, आरिफ कांचवाला, संजय कांबळे, भोलेनाथ वांजळे, योगेश भोकरे, ऋषिकेश विरकर, गौरव बाळंदे, अस्लम बागवान, शिवाजीराव आढाव आणि गोपाळ तिवारी हे सर्व सध्या इच्छुक आहेत.
भाजपकडून ही नावं चर्चेत
दिवंगत आमदार मुक्ता टिळक यांचे पती शैलेश टिळक हे इच्छुक असल्याची माहिती आहे. याशिवाय कोथरुडच्या माजी आमदार मेधा कुलकर्णी, भाजप खासदार गिरीश बापट यांच्या स्नुषा स्वरदा बापट, स्थायी समितीचे माजी अध्यक्ष हेमंत रासने, माजी सभागृह नेते धीरज घाटे, माजी नगरसेवक अशोक येनपुरे, माजी सभागृह नेते गणेश बिडकर यांचीही नाव चर्चेत आहेत.