162 गावांना फटका, 1593 हेक्टर शेतीचे नुकसान
अमरावती : गेल्या काही दिवसांपासून मुसळधार पाऊस होत आहे. त्यातच या पावसाचा अमरावती जिल्ह्यातील 162 गावांना मोठा फटका बसला आहे. हवामानातील अचानक बदलामुळे शेतकरी वर्गासमोर मोठे संकट उभे राहिले असून, आतापर्यंत 1593 हेक्टर क्षेत्रातील शेती पिकांचे नुकसान झाल्याचे अधिकृत आकडेवारीतून समोर आले आहे. अशातच गुरुवारी (दि.29) सायंकाळी पावणेसातच्या सुमारास वादळी वाऱ्यासह पुन्हा पावसाला सुरुवात झाली. या पावसामुळे जनजीवनासह शेती पिकांना आणखी मोठा फटका बसला आहे.
मुसळधार पावसामुळे केवळ शेतीच नव्हे; तर मानवी वस्तीवरही विपरीत परिणाम झाला आहे. जिल्ह्यात 143 घरांची अंशतः पडझड झाली आहे. यामुळे अनेक कुटुंबांचे निवासस्थान धोक्यात आले असून, प्रशासनाकडून पंचनामे सुरू करण्यात आले आहेत. या दरम्यान, वीज पडून दोन जनावरांचा मृत्यू झाल्याचेही नोंदवण्यात आले आहे. ही घटना शेतकऱ्यांसाठी आर्थिक नुकसानीची आणखी एक भर ठरली आहे. शेतकरी वर्गात निर्माण झालेली अस्थिरता, घरांच्या नुकसानीमुळे वाढलेली चिंता आणि हवामानातील अनिश्चितता यामुळे जिल्ह्याभरात नागरिकांमध्ये अस्वस्थतेचे वातावरण निर्माण झाले आहे.
हेदेखील वाचा : Landslides Risk : रायगड जिल्ह्यातील ३९२ गावांना दरडींचा धोका, धूप भूवैज्ञानिकांच्या सर्वेक्षणानंतर आणखी २८९ गावांचा समावेश
दरम्यान, प्रशासनाने संबंधित भागात तत्काळ पंचनामे व मदतकार्य सुरू केले असून, पावसाचा फटका बसलेल्या शेतकऱ्यांना आणि नागरिकांना मदतीचा हात देण्यासाठी उपाययोजना करण्यात येत असल्याचे प्रशासनाच्या वतीने सांगण्यात आले आहे.
ज्वारी, केळी, कांद्याचेही नुकसान
अंजनगावसुर्जी तालुक्याला मान्सूनपूर्व पावसाने चांगलेच झोडपले असून, एकाच दिवशी 86 मी. मी. पावसाची नोंद झाली आहे. गेल्या पन्नास वर्षात मे महिन्यात एकाच दिवशी झालेला हा सर्वात जास्त पावसाची नोंद झाली आहे. मंगळवारी झालेल्या वादळी पावसाने तालुक्यातील साडे चारशे हेक्टरवरील उन्हाळी ज्वारी पिकाला मोठा फटका बसला असून कांदा, केळी, या पिकांचेही मोठे नुकसान झाले.