कोल्हापुरात मुसळधार पावसाचा गर्भवती महिलेला फटका; वेळेवर उपचार न मिळाल्याने भर पावसात झाली प्रसूती, बाळ दगावलं
कोल्हापूर : गगनबावडा तालुक्यातील बोरबेट येथील कल्पना आनंद डुकरे (वय ३०) या सात महिन्याच्या गर्भवती महिलेला प्रसूतीसाठी गगनबावडा ग्रामीण रुग्णालयात दाखल करण्यात आले. मात्र, आवश्यक वैद्यकीय सुविधा या ठिकाणी उपलब्ध नसल्याने पुढील उपचारासाठी कोल्हापूर रुग्णालयात नेत असतानाच गगनबावडा-कोल्हापूर मार्गावर रुग्णवाहिकेत या महिलेची प्रसूती झाली. यामध्ये आई सुखरूप राहिली आहे. मात्र, दुर्दैवाने बाळाचा मृत्यू झाला.
रुग्णवाहिकेत महिलेची प्रसूती झाल्यानंतर नवजात बालकाचा मृत्यू झाला. पण महिला बचावली. तिला पुढील उपचारासाठी चादरीची झोळी करून तरुणांनी पुराच्या पाण्यातून चालत जात सीपीआर येथे उपचारासाठी दाखल केले. या घटनेकडे पाहिले असता आरोग्य व्यवस्थेतील गंभीर त्रुटी आणि पावसाळ्यात नागरिकांना भोगावे लागणाऱ्या हालअपेष्टा अधोरेखित करणारे ठरले आहे. रुग्णालयात तज्ञ डॉक्टरांचा अभाव, आवश्यक असणारा पुरवठा, पायाभूत सुविधा, अत्याधुनिक यंत्रणाची कमतरता असल्याने नागरिकांची जीव धोक्यात येत आहेत. विशेषत: गर्भवती महिला, लहान मुले व वृद्धांचे आरोग्य धोक्यात आले आहे.
दरम्यान, पावसाळा सुरू होताच गगनबावडा मार्गावर वाहतूक ठप्प होते व जीविताला धोका निर्माण होतो. त्यामुळे ग्रामीण रुग्णालयात अत्यावश्यक वैद्यकीय सेवा, तज्ञ डॉक्टर, आधुनिक साधनसामग्री उपलब्ध करणे गरजेचे आहे. अन्यथा अशा प्रकारच्या घटना घडून धोका निर्माण होण्याची भीती व्यक्त केली जात आहे.
सक्षम आरोग्य यंत्रणा उभारणे ही काळाची गरज
नागरिकांच्या आरोग्याशी खेळ मांडणार्या प्रणालीवर तातडीने अंकुश ठेवून सक्षम आरोग्य यंत्रणा उभारणे ही काळाची गरज असल्याचे यावरून दिसून येते. सध्या गगनबावडा परिसरात जोरदार पाऊस असल्याने तसेच पंचगंगा नदीला पूर आल्याने गगनबावडा कोल्हापूर वाहतूक मार्ग पूर्णता बंद झाला आहे .त्यामुळे रस्त्यावरून वाहतूक करणे सुद्धा धोकादायक बनले आहे.