Fraud
नागपूर : विदेशी कंपनीत पैसे गुंतवून बक्कळ नफा कमावण्याचे आमिष दाखवून ठकबाजांच्या टोळीने (Fraud) शहरातील व्यावसायिकाला 5.39 कोटी रुपयांचा गंडा घातला. पोलिसांनी या प्रकरणात अंकुरकुमार अग्रवाल (रा.दिघोरी) यांच्या तक्रारीवरून चर्चित मंदार कोलतेसह 18 आरोपींवर गुन्हा नोंदविला आहे.
कोलतेला यापूर्वीही दोन प्रकरणात अटक झाली आहे. इतर आरोपींमध्ये मुकेश चव्हाण (रा. रायगड), गोयल उर्फ सूरज डे (रा. मुंबई), मंगेश पाटेकर उर्फ दिनेश कदम, मोहनीश उर्फ राहुल, अमन पांडे, भारत उर्फ सुलेमान, दिनेश मिश्रा, अजय वाघमारे, राकेश कुमार, राजू मंडल, राहुल गायकवाड, संदीप पाटील, अल्पेश पटेल, करण, दिनेश जोशी, विक्रांत आणि युनुस शेख (रा. हसनबाग) चा समावेश आहे.
अंकुर कोळशाचा व्यवसाय करतात. मंदारशी त्यांची जुनी ओळख होती. त्याने अंकुर यांना मुंबईचे काही मोठे ट्रेडर विदेशी कंपन्यांमध्ये पैसे गुंतवितात. तीन महिन्यात गुंतविलेल्या पैशांवर 20 टक्के लाभ मिळत असल्याची बतावणी केली. त्याने फोनवर काही लोकांशी बोलणेही करून दिले. आरोपींनी एक्स्ट्रीम नेटवर्क इंडिया प्रा. लि.चे कर्मचारी असल्याचे सांगितले. त्यानंतर कोलते त्यांना मुंबईला घेऊन गेला. भव्य हॉटेलमध्ये वेगवेगळ्या आरोपींशी बैठकही घालून दिली. इतर आरोपी आपले नावही खोटे सांगत होते. अंकुरने त्यांच्यावर विश्वास ठेवून सांगितलेल्या वेगवेगळ्या खात्यांमध्ये वेळोवेळी 5.39 कोटी रुपये पाठवले.
मंदार कोलतेसह 18 जणांवर गुन्हा
आरोपींनी रक्कम सुरक्षित असल्याचा पुरावा म्हणून त्यांना डीडीही दिला होता. पैसे गुंतवून बरेच दिवस लोटल्यानंतरही अंकुर यांना लाभ मिळाला नाही. त्यांनी आपले पैसे परत मागितले असता कोलते टाळाटाळ करू लागला. अंकुर यांनी आरोपींनी दिलेला डीडी तपासला असता बनावट असल्याचे समजले. अंकुर यांनी सिक्युरिटी म्हणून दिलेला धनादेशही आरोपींनी वटवला होता. मंदारने इतरही लोकांची अशाच प्रकारे फसवणूक केल्याचे समजल्यानंतर अंकुर यांनी आर्थिक गुन्हे अन्वेषण शाखा (ईओडब्ल्यू) कडे तक्रार केली. या तक्रारीवरून 18 जणांवर गुन्हा दाखल करण्यात आला.