म्हाडा कोकण मंडळातर्फे 5354 घरांच्या सोडतीची तारीख ठरली (फोटो सौजन्य-X)
मुंबई : प्रत्येक सर्वसामान्य माणून त्याते स्वत:चे हक्काचे घर असावे, असे स्वप्न घेवून जगत असतो. ते स्वप्न पूर्ण करण्यासाठी तो खूप कष्ट घेतो. अशा सर्वसामान्यांचे हे स्वप्न म्हाडा पूर्ण करत आहे. म्हाडाच्या कोकण गृहनिर्माण व क्षेत्रविकास मंडळातर्फे ठाणे शहर व जिल्हा, वसई (जि. पालघर) येथील विविध गृहनिर्माण योजनेअंतर्गत उभारण्यात आलेल्या ५३५४ सदनिका व ओरोस (जि. सिंधुदुर्ग), कुळगाव-बदलापूर येथील ७७ भूखंड विक्रीकरिता संगणकीय सोडत राज्याचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या हस्ते शनिवार, ११ ऑक्टोबर २०२५ रोजी ठाणे येथील डॉ. काशीनाथ घाणेकर नाट्यगृह येथे काढण्यात येणार आहे. सदर सोडतीसाठी १,८४,९९४ अर्ज प्राप्त झाले असून अनामत रकमेसह १,५८,४२४ अर्ज प्राप्त झाले आहेत.
कोकण मंडळातर्फे सोडत कार्यक्रमाचे सुयोग्य नियोजन करण्यात आले आहे. कार्यक्रम स्थळी उपस्थित अर्जदारांना निकाल सुलभतेने पाहता यावा, याकरिता सभागृहाच्या आवारात व सभागृहात एलईडी स्क्रीन लावण्यात येणार आहे. तसेच अर्जदारांना ‘वेबकास्टिंग’ तंत्रज्ञानाच्या माध्यमातून https://youtube.com/live/K9bX1SXAESQ?feature=share या लिंकवर व म्हाडाचे अधिकृत फेसबूक https://www.facebook.com/mhadaofficial व https://www.youtube.com/@MHADAOFFICIAL या यूट्यूब पेजवर सोडतीच्या कार्यक्रमाचे घरबसल्या थेट प्रक्षेपण बघण्याची सुविधाही उपलब्ध करून देण्यात येणार आहे. सोडतीचे थेट प्रक्षेपण वेबकास्टिंग व म्हाडाच्या अधिकृत फेसबूक पेजवर करण्यात येणार असल्याने नागरिकांना अल्पावधीतच सोडतीचा निकाल जाणून घेता येणार आहे. सोडतीतील विजेत्या अर्जदारांची यादी म्हाडाच्या https://housing.mhada.gov.in या वेबसाईटवर सायंकाळी ६.०० वाजेनंतर प्रसिद्ध केली जाणार आहे. तसेच विजेत्या अर्जदारांना एसएमएसद्वारेही विजेता ठरल्याबाबतच संदेश त्यांनी अर्जासोबत नोंद केलेल्या भ्रमणध्वनी क्रमांकावर तात्काळ प्राप्त होणार आहे, अशी माहिती कोकण मंडळाच्या मुख्य अधिकारी श्रीमती रेवती गायकर यांनी दिली.
कोकण मंडळातर्फे जाहीर करण्यात आलेली ही सोडत पाच घटकांमध्ये विभागण्यात आली आहे. २० टक्के सर्वसमावेशक योजनेअंतर्गत एकूण ५६५ सदनिका, १५ टक्के एकात्मिक शहर गृहनिर्माण योजनेअंतर्गत ३००२ सदनिका, म्हाडा कोकण मंडळ गृहनिर्माण योजना व विखुरलेल्या सदनिका आहे त्या स्थितीमध्ये या योजनेअंतर्गत १७४६ सदनिका, म्हाडा कोकण मंडळ गृहनिर्माण योजनेअंतर्गत (५० टक्के परवडणार्या सदनिका) ४१ सदनिका विक्रीसाठी उपलब्ध आहेत. तसेच म्हाडा कोकण मंडळ गृहनिर्माण योजनेअंतर्गत ७७ भूखंड विक्रीसाठी उपलब्ध आहेत. सदर सोडत संगणकीय प्रणाली IHLMS 2.0 (Integrated Housing Lottery Management System) च्या माध्यमातून होत आहे. या प्रणालीनुसार अर्ज नोंदणीकरण व अर्जदाराची पात्रता निश्चिती झाल्यानंतरच अर्जदार सोडत प्रक्रियेत सहभाग घेत आहे.