पुणे जिल्हा परिषदेच्या सदस्यांसाठी 73 गट तर पंचायत समितीच्या सदस्यांसाठी 146 गण जाहीर (संग्रहित फोटो)
पुणे : राज्य शासनाच्या ग्रामविकास विभागाने राज्यातील 32 जिल्हा परिषदा व 336 पंचायत समितीच्या सदस्यांसाठी गट व गणसंख्या जाहीर केली आहे. यामध्ये पुणे जिल्हा परिषदेच्या सदस्यांसाठी 73 गट जाहीर करण्यात आले आहेत. तर पंचायत समितीच्या सदस्यांसाठी 146 गण जाहीर करण्यात आले आहेत.
पुणे जिल्ह्यातील 13 पंचायत समित्यांचा कार्यकाळ १३ मार्च २०२२ तर, पुणे जिल्हा परिषदेचा कार्यकाळ हा २० मार्च २०२२ रोजी संपला होता. तेव्हापासून आजतागायत या सर्व पंचायत संस्थांवर प्रशासकराज आहे. दरम्यान, सर्वोच्च न्यायालयाने ६ मे रोजी जिल्हा परिषद आणि पंचायत समित्यांच्या निवडणुकांबाबत दिलेल्या निर्णयामुळे गेल्या तीन वर्षांपासून चातकाप्रमाणे निवडणुकीची वाट पहात असलेल्या इच्छुकांमध्ये मोठ्या जल्लोषाचे वातावरण निर्माण झाले होते. राज्याच्या ग्रामविकास विभागाने अखेर जिल्हा परिषद व पंचायत समिती गण व गट संख्या जाहीर केली आहे.
राज्यात महापालिका, नगरपालिका व नगर परिषदा यांच्या निवडणुका झाल्यावर जिल्हा परिषदेच्या निवडणुका होण्याची शक्यता आहे. जिल्हा परिषदेच्या व पंचायत समितीच्या २०१७ मध्ये झालेल्या पंचवार्षिक निवडणुकीत पुणे जिल्हा परिषदेच्या गटांची संख्या ७५ तर, जिल्ह्यातील १३ पंचायत समितीच्या एकूण गणांची संख्या १५० होती. मात्र, २०१८ मध्ये पुणे महापालिका हद्दीत नव्याने काही गावे समाविष्ट झाल्याने येत्या निवडणुकीसाठी जिल्ह्यातील गट व गणसंख्या कमी झाली आहे. त्यानुसार गट ७३ व गण संख्या १४६ झाली अनुक्रमे यात २ व ४ ने कमी झाली आहे.
१८ ऑगस्टपर्यंत प्रभाग रचना जाहीर करा
राज्यातील ३२ जिल्हा परिषदा व त्यात ३३६ पंचायत समित्याकांकरिता प्रभाग रचना करण्याची सूची ग्रामविकास विभागाने जाहीर केली आहे. यात १४ जुलै रोजी प्रभाग रचनेची अधिसूचना प्रसिद्ध करणे, २१ जुलैपर्यत जिल्हाधिकारी यांच्याकडे हरकती व सूचना सादर करणे, प्राप्त हरकती व सूचना आधारे अभिप्रायसह विभागीय आयुक्त यांना प्रस्ताव सादर करण्यास सूचित केले आहे. या हरकती व सूचना यांच्यावर ११ ऑगस्ट रोजी सुनावणी घेऊन १८ ऑगस्टपर्यंत अंतिम प्रभाग रचना निवडणूक आयोगाकडे पाठविण्यास सांगण्यात आले आहे.






