
गडचिरोलीत ७३ टक्के अल्पभूधारक शेतकरी! उत्पन्नवाढीत खोडा; सामूहिक शेतीला चालना देण्याची गरज
Amravati News: कृषी गणनेंतील आकडेवारीनुसार, गडचिरोली जिल्ह्यात शेतीचे स्वरूप प्रामुख्याने लहान आणि अल्पभूधारक शेतकऱ्यांचे असल्याचे स्पष्ट झाले आहे. जिल्ह्यात एकूण १ लाख ५१ हजार ७३३ भूधारक असून, त्यांच्याकडे सुमारे २ लाख ४२ हजार ४५१.६९ हेक्टर शेतीक्षेत्र आहे. मात्र, या क्षेत्राची विभागणी पाहता बहुतांश शेतकऱ्यांकडे अत्यल्प जमीन असल्याने शेती किफायतशीर आणि फायदेशीर बनविण्याचे मोठे आव्हान निर्माण झाले आहे.(फोटो सौजन्य – AI)
आदिवासीबहुल गडचिरोली जिल्ह्यात ते २ हेक्टर जमीन असलेल्या शेतकऱ्यांचे प्रमाण ७३.०२ टक्के आहे. या शेतकऱ्यांकडे जिल्ह्याच्या एकूण शेतीक्षेत्रापैकी ३९.५९ टक्के क्षेत्र आहे. तर २ ते ५ हेक्टर जमीन असलेल्या शेतकऱ्यांचे प्रमाण २२.८० टक्के असून, त्यांच्याकडे एकूण शेतीक्षेत्रापैकी ३९.८९ टक्के क्षेत्र आहे. म्हणजेच, जवळपास ९६ टक्के शेतकरी ५ हेक्टरपेक्षा कमी जमीनधारक आहेत. याउलट, ५ ते १० हेक्टर जमीन असलेल्या शेतकऱ्यांचे प्रमाण केवळ ३.५५ टक्के, १० ते २० हेक्टर जमीनधारकांचे प्रमाण ०.५५ टक्के, तर २० हेक्टरपेक्षा अधिक जमीन असलेल्या शेतकऱ्यांचे प्रमाण अवघे ०.०८ टक्के आहे.
लहान क्षेत्रामुळे शेतीसमोर अनेक अडचणी; शेतीचे क्षेत्र लहान तुकड्यांत विभागलेले असल्याने आधुनिक यंत्रांचा वापर, सिंचन सुविधा, पीक विविधीकरण, साठवणूक, कृषी प्रक्रिया उद्योग आणि बाजारपेठेपर्यंत पोहोच यामध्ये अडचणी निर्माण होतात. परिणामी, उत्पादन खर्च वाढतो; मात्र त्या तुलनेत उत्पन्नात वाढ होत नाही. त्यामुळे अनेक शेतकऱ्यांना शेतीसोबत मजुरी किंवा अन्य रोजगाराचा आधार घ्यावा लागतो.
तज्ज्ञांच्या मते, गडचिरोलीसारख्या जिल्ह्यात सामूहिक अर्थात गटशेती हा प्रभावी पर्याय ठरू शकतो. अनेक शेतकरी एकत्र येऊन मशागत, बियाणे, खते, सिंचन, यांत्रिकीकरण, काढणी, साठवणूक आणि विक्रीची कामे सामूहिकरीत्या केल्यास उत्पादन खर्चात बचत होऊन उत्पादकता वाढण्यास मदत होऊ शकते. शेतकरी उत्पादक कंपन्या, सहकारी संस्था आणि गटशेतीच्या माध्यमातून बाजारपेठेतही चांगला भाव मिळविण्याची संधी निर्माण होऊ शकते.
Amravati News: दुष्काळात शाळांचा फीसाठी तगादा! जिल्हाधिकारी, शिक्षणाधिकाऱ्यांनी लक्ष देण्याची मागणी
विशेष म्हणजे, जिल्ह्यात संयुक्त धारण क्षेत्राचे प्रमाण २४.९२ टक्के आहे. या क्षेत्राचा प्रभावी वापर करून सामूहिक शेती, यांत्रिकीकरण, सिंचन आणि आधुनिक शेती पद्धती राबविल्यास लहान शेतकऱ्यांचे उत्पन्न वाढण्यास मदत होऊ शकते. अल्पभूधारक शेतकऱ्यांसाठी केवळ अनुदानाच्या योजना पुरेशा ठरणार नाहीत. शेतीला उद्योगाचे स्वरूप देण्यासाठी गटशेती, मूल्यवर्धन, कृषी प्रक्रिया उद्योग, सेंद्रिय शेती, कृषी पर्यटन आणि शेतकऱ्यांना थेट बाजारपेठेशी जोडणाऱ्या योजनांची प्रभावी अंमलबजावणी करणे आवश्यक आहे. अन्यथा शेतीतील उत्पन्नवाढीचे उद्दिष्ट साध्य करणे कठीण ठरेल, अशी भीती कृषी क्षेत्रातील तज्ज्ञांकडून व्यक्त केली जात आहे.