
फोटो सौजन्य सोशल मीडिया
नागपूर विभागात परिस्थिती तुलनेने ठीक असली तरी अमरावती विभागात स्थिती गंभीर असल्याचे सांगितले जात आहे. परिणामी कापसाच्या उत्पादनात यंदा २० ते २५ टक्क्यांपर्यंत घट होण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. सरकारी आकडेवारी अद्याप समोर आलेली नसली तरी खासगी अंदाजातून उत्पादनातील घट स्पष्ट होत आहे. उत्पादन कमी झाल्यास बाजारातील कापसाच्या दरात वाढ होण्याची शक्यता आहे. मात्र, त्याचा शेतकऱ्यांना अपेक्षित फायदा मिळेलच असे नाही.
कापूस व्यापाऱ्याऱ्यांनी दिलेल्या माहितीनुसार, मागील वर्षी कापसाला कमाल ७४०० ते ७५०० रुपये क्विंटलपर्यंत भाव मिळत होता. यंदा मात्र कापसाचा दर आतापासूनच ८६०० रुपये क्विंटलच्या पुढे आहे. आगामी काळात हा दर ९ हजार रुपयांचा टप्पा ओलांडण्याची शक्यता असून, यंदा कापसाचा भाव ९५०० रुपये क्विंटलपेक्षाही अधिक होऊ शकतो.
दरवाढीचा काही प्रमाणात फायदा शेतकऱ्यांना होईल; मात्र दुष्काळग्रस्त भागातील उत्पादकांना उत्पादनातील घटेमुळे मोठा फटका बसण्याची शक्यता आहे. केंद्र सरकारने जाहीर केलेल्या एमएसपीपेक्षाही बाजारात अधिक दर मिळत आहे. केंद्राने यंदा कापसासाठी तीन स्लॅबमध्ये एमएसपी निश्चित केली आहे.
त्यानुसार ८५६७, ८६१७ आणि ८६६७ रुपये असे दर ठरविण्यात आले आहेत. है दर २७.५ एमएमपासून २९.५ प्लस एमएमपर्यंतच्या कापसासाठी लागू आहेत. सध्या बाजारात दाखल होणाऱ्या कापसामध्ये आर्द्रतेचे प्रमाण मोठे असल्याचे व्यापाऱ्यांनी सांगितले.
Nagpur Police : डेटाच्या आधारे ठरणार पोलिसांचे संख्याबळ; मुंबईच्या धर्तीवर ‘अर्बन पोलिसिंग’
कापूस क्षेत्रातील जाणकारांच्या मते, मागील वर्षी राज्यात सुमारे ११५ लाख गाठी कापसाचे उत्पादन झाले होते. यंदा है उत्पादन घटून ९० ते ९५ लाख गाठींपर्यंत राहण्याचा अंदाज आहे. सुरुवातीला पावसाचा फटका बसला, तर आता कडक उन्हामुळे पिकाचे नुकसान होत आहे. विदर्भ आणि मराठवाड्यात त्याचा सर्वाधिक परिणाम जाणवत आहे. उत्पादनात तब्बल २० लाख गाठींची घट झाल्यास शेतकऱ्यांना मोठा आर्थिक फटका बसण्याची शक्यता आहे.
Nagpur News : पाण्यासाठी हाहाकार ;मनपा बेफिकीर
केंद्रस्तरीय बैठकीत झालेल्या निर्णयानुसार, महाराष्ट्रात पहिल्या टप्प्यात भारतीय कापूस महामंडळ लिमिटेडकडून (सीसीआय) १७९ खरेदी केंद्रे सुरू करण्यात येणार आहेत. यापैकी ९६ केंद्रे विदर्भात असतील. गरज भासल्यास बाजारातील परिस्थितीनुसार आणखी केंद्रे सुरू करण्याची तयारी सीसीआयने ठेवली आहे.
मात्र, बाजारभाव अधिक असल्याने शेतकरी खासगी व्यापा-यांकडे कापूस विक्रीसाठी जाण्याची शक्यता अधिक असल्याचे अधिकाऱ्याऱ्यांचे मत आहे. सीसीआयकडे एमएसपीवर कापूस विकण्याऐवजी बाजारातील अधिक दराचा लाभ घेण्याकडे शेतक-यांचा कल राहण्याची शक्यता आहे.