पनवेल / दिपक घरत : अन्न वस्त्र आणि निवारा या माणसाच्या प्रमुख गरजा आहेत. मात्र काहींना या प्रमुख गरजा पुरवण्यासाठी देखील अनेक आव्हानांना सामोरं जावं लागतं. याचं जीवंत उदाहरण म्हणजे पनवेलमधील घटना. काही माणसं जगण्यासाठी संघर्ष करत असली तरी त्यांच्या अंगी स्वाभिमान असतो. त्यांना कोणाचे उपकार नको असतात. अशीच एक घटना आहे पनवेलमधील मायलेकाची.
नवीन पनवेल येथे राजीव गांधी मैदानाच्या समोर एक 79 वर्षाची वृद्ध आई आणि 54 वर्षाचा तिचा मुलगा रस्त्यावर राहत आहेत. भाडे थकल्यामुळे घरमालकांनी बाहेर काढल्यानंतर या मायलेकांवर सहा महिन्यापासून रस्त्यावर राहण्याची वेळ आली आहे.80 व्या वर्षांमध्ये पदार्पण केलेल्या विमल पवार यांचा जन्म मुबंई मधील गोरेगाव चा अत्यंत सदन कुटुंबात जन्माला झाला. त्यांचा विवाह मूळचे सातारा येथील मात्र मुंबईत वास्तव्य असलेल्या पवार कुटुंबात झाले होते.विमल यांचे पती लेखापाल म्हणून म्हणून काम करत होते.तर तर महेश पवार हा मुलगा खाजगी ठिकाणी कामाला होता.
पतीच्या अकाली निधनानंतर कुटुंबाची जबाबदारी आलेला महेश मिळणाऱ्या पगारावरती आपलं घर चालवत होता.मात्र अचानक नोकरी गेल्याने ते आर्थिक विवंचनेमध्ये गेले. त्यानंतर पवार हे आपल्या आईला घेऊन पनवेल एका गावात भाड्याच्या खोलीत राहायला आले.पण येथेही हवे तसे काम न मिळाल्याने वेळेत भाडे भरणे शक्य न झाल्याने घर मालकाकडून देण्यात आलेल्या त्रासाला कंटाळून महेश यांनी आईला घेऊन वृद्धाश्रमात राहण्याचा निर्णय घेतला. वृद्धाश्रमात होणाऱ्या गैरसोईला कंटाळून तसेच घर भाडे भरण्यासाठी पैसे नसल्याने सध्या ही आई आणि लेकाची जोडी नवीन पनवेल येथिल आदई सर्कल या ठिकाणी असलेल्या पदपथावर रहात आहे. विचारपूस करण्यासाठी येणाऱ्या नागरिकांनी मदत करण्याचा इच्छा दर्शवल्यास उपकार नको काम द्या अशी मागणी ते त्यांच्यकडे करतात.
वृद्धाश्रम बंदीवास
अनेक जण या मायलेकांना मदत करण्याची इच्छा त्यांच्याकडे व्यक्त करतात. काही जण वृद्धाश्रमात राहण्याची व्यवस्था करतो असेही सांगतात. मात्र वृद्धाश्रमातील बंदिवसात राहण्याची इच्छा आम्हांला नाही. आमच्या तब्येतीला झेपेल असं काम मिळाल्यास त्यातून मिळणाऱ्या पगारातून आम्ही भाड्याच्या घरात राहू असं हे मायलेक सांगतात.
अनेकांकडून जेवणाची मदत
सहा महिन्या पासून फुटपाथ राहत असल्याने अनेकजण स्वखुशीने जेवणाची आणि नाष्ट्याची सोय करत असल्याची माहिती देखील पवार यांनी दिली. घर मिळवून देण्याचे आश्वासनं देखील काहींनी दिल्याची माहिती देखील त्यांनी दिली. आम्ही स्वाभिमानी आहोत आम्हाला कोणाचे उपकार नको तर आम्हाला आमच्या वयाला झेपेल असं काम द्या आम्ही आमचा उदरनिर्वाह करु शकतो असं या मायलेकांनी सांगितलं आहे.