फोटो सौजन्य - Social Media
पावसाचा जोर वाढला होता. या वाढत्या कोसळधारेत घरी बसून फक्त चहा आणि भजीने काम चालवणे ठीक नाही. त्यामुळे रमेशला एक भन्नाट आयडिया आली. रमेशने त्याच्या प्रेयसीला तात्काळ फोन केला. त्याने तिला या सुंदर वातावरणाला अनुभवण्यासाठी महाबळेश्वरची सफर करूयात असे सांगितले. नेहा त्याच्या म्हणण्याला लगेच राजी झाली. या प्लॅनमध्ये रमेशचा मित्र वरुणही शामिल होता. तसेच पनवेलला वरुणची प्रेयसी संगीता त्या सगळ्यांना जॉईन करणार होती.
रात्री जेवण वगैरे आटपून रमेश, नेहा आणि वरुण भायखळ्याहून महाबळेश्वरकडे रवाना होतात. वाटेत त्यांना संगीता येऊन मिळते. चौघे अगदी वाऱ्याच्या वेगाने महाबळेश्वरच्या दिशेने जात असतात. रस्त्याला वाहनांची जास्त गर्दळ नव्हती. पावसाचा वेगही तसा मंदावत जात होता. मध्यरात्रीचे २ वाजत असताना गाडी एका घाटामध्ये असते. ते महाबळेश्वरच्या अगदी जवळ पोहचले असतात. अशात वरुणला जोरात वॉशरूमला होते. तो रमेशला रस्त्याच्या शेजारी गाडी घेण्यासाठी सांगतो. गाडी अगदी घाटमाथ्यावर असते. वरुण रस्त्याच्या किनाऱ्यावर जाऊन त्याचे कार्यक्रम पूर्ण करतो.
दरम्यान, तो रमेशला जोरात हाक देतो आणि म्हणतो “तुम्हाला कुणाच्या रडण्याचा आवाज येतोय का? कुणीतरी रडतेय इथे…” रमेश म्हणतो “सोड रे, तू तुझं काम पूर्ण कर आणि ये पटपट!’ पण वरुणच्या मनात विचारांची पाल कुजबुजत असते. त्यात गाडीमध्ये त्या तिघांची चर्चा सुरु होते. अशामध्ये वरुणला बाहेर जाऊन फार वेळ झाल्याने रमेश वरुणच्या दिशेने पाहतो. ते दृश्य पाहून रमेशच्या अंगातून घामाच्या धारा निघतात. कारण वरुण दूरदूरपर्यंत कुठेच दिसत नसतो. रमेश तसाच गाडीमधून उतरतो. धावत धावत त्या ठिकाणी जातो. तिथे आजूबाजूला कुणी त्याला दिसत नाही. थोडा पुढे जाऊन रमेश त्याला शोधण्याचा प्रयत्न करतो पण त्याला फार दूरवर एक गर्दी प्रकाशझोत हातात घेऊन चालताना दिसते. रमेशला तिथे जाण्याचे धाडस होत नाही. तो घाबरून गाडीकडे वळतो. गाडीकडे जाऊन पाहतो तर काय? वरुण गाडीमध्ये बसलेला असतो. नेहा रमेशवर भडकते. म्हणते “तू वेडा आहेस का? या रात्री रानात फिरणे तुला मज्जा वाटते?” तोंडावर बारा वाजलेले असणारा रमेश वरुणकडे पाहतो आणि त्याला विचारतो “तू कधी आला?” तेव्हा नेहाचं त्याला उतरते “ए, आंधळ्या. तू जसा गेला तसा तुझ्या बाजूनेच आला होता तो. आम्ही तुला इतके आवाज दिला. तू ना आम्हाला ऐकलं ना पाहिलं. बस आता गाडीमध्ये!” रमेशच्या चेहऱ्यावर प्रश्नचिन्ह पडला होता. चौघे अगदी तासाभरात महाबळेश्वरला एका हॉटेलमध्ये येऊन ठेपले.
दुसरा दिवस उजडला. रमेशने एक गोष्ट लक्षात घेतली की वरुणच्या वागण्यात बदल झालाय. तो शांत शांत आहे. चौघे मॅप्रो गार्डनकडे रवाना होतात. त्यांच्या हॉटेलकडून मॅप्रो गार्डनकडे जाणारा रस्ता तसा २० मिनिटांवर आहे. ते चौघे मॅप्रो गार्डनकडे रवाना होतात. दरम्यान, ते अशा एका ठिकाणावर थांबतात जेथून संपूर्ण लोणावळा परिसर पाहता येतो. चौघे तिथे उतरतात. मज्जा करतात पण त्यात वरुण फार गुमसुम असतो. काल ते प्रकरण घडल्यापासून रमेशही त्याच्यावर लक्ष देत असतो, त्यालाही हे जाणवते की वरूनच काय तरी बिनसलंय. त्याच्यात फार बदल जाणवतोय. तिथे गोंधळ घालून हे चौघे मॅप्रो गार्डनच्या दिशेने निघाले.
गाडीत असताना रमेशची नजर मागे बसलेल्या वरुणवरच होती. पण या प्रवासात त्यांच्यासोबत असं घडलं, जे विचारांच्या पलीकडे होते. रमेश गाडी चालवत असतो. ज्या ठिकाणी ते आधी थांबले होते. ते ठिकाण वारंवार पुन्हा पुन्हा त्यांना दिसत होते. गाडी त्याच ठिकाणी गोल फिरत होती. जणू काही त्यांना चकवाच लागला होता. रमेश, नेहा तसेच संगीता फार घाबरलेले होते पण रमेशचे लक्ष वरुणवर जाते. जेव्हा ते ठिकाण गाडीशेजारी येते, वरुणच्या चेहऱ्यावर एक वेगळाच आनंद येतो. रमेशला खात्री बसते, की दाल में कुछ काला है! इतक्यात एक गाडी त्यांच्या शेजारून जाते, त्या गाडीचा पाठलाग करत ती लोकं चकव्यातून सुटतात.
चौघे मॅप्रो गार्डनला असतात. फिरत असताना अचानक रमेशला पोलिसांचा कॉल येतो. त्या कॉलवर झालेले संभाषण ऐकून रमेशच्या पायाखालची जमीन सरकते. पोलीस त्याला म्हणतात की तुमचा मित्र वरुण घाटाच्या रस्त्याच्या शेजारी बेशुद्ध अवस्थेत सापडला आहे. कॉल झाल्यावर कुणाला काही न सांगता, रमेश वरुणचा शोध घेतो पण वरुण तिथे कुठेच भेटत नाही जणू तो अचानक गायब झालेला असतो. रमेश हे प्रकरण सगळ्यांना सांगतो. सगळे अगदी घाबरून जातात, “मग तो कालपासून आपल्यासोबत होता तो कोण होता?” असा प्रश्न सगळ्यांच्या डोक्यात नांदत असतो.
सगळी कामे तसेच सोडून ती तिघे त्या ठिकाणावर येऊन पोहचतात. वरुण पोलिसांसोबत असतो. वरुणला काय झाले विचारले असता, तो इतकेच सांगतो की,” मी त्या बाईच्या रडण्याच्या आवाजच्या दिशेने गेलो. झाडावर ती बसली होती. हळहळू माझ्याजवळ आली. नंतर मला काहीच आठवत नाही.” रमेश म्हणतो “ठीके. झालं ते विसरायचा प्रयत्न कर. तू काहीच मज्जा केली नाही. आता आलाच आहेस शुद्धीत! तर पुन्हा महाबळेश्वरला जाऊ किमान १ दिवस तरी काढू.” सगळे महाबळेश्वरला जातात. एक दिवस पूर्ण धमाल करतात. आता परतीचा प्रवास येतो.
संध्याकाळच्या सुमारास ते चौघे त्याच घाटातून प्रवास करत असतात. प्रवासादरम्यान अचानक रमेशला वॉशरूमला होते. तो कुणाला काही न सांगता गाडी रस्त्याच्या शेजारी घेतो. वरुण गाडीच्या बाहेर पाहतो तर काय? हे तेच ठिकाण होते, जिथे तो बेशुद्ध पडला होता. तो रमेशला आवाज देत असतो पण रमेशला काहीच ऐकू जात नाही. रमेश आरामात त्याचा कार्यक्रम करत असतो. इतक्यात रमेशला कुणी तरी रडतानाचा आवाज ऐकू येतो…