
Fraud
वर्धा : रेल्वेत नोकरी लावून देतो, अशी बतावणी करून दोन व्यक्तींनी 8 जणांना तब्बल 20 लाख रुपयांचा चुना लावला. पैसे देऊनही नोकरी न लागल्याने दाखल तक्रारीवरून पोलिसात गुन्हा नोंद करण्यात आला. ही घटना शहरातील गोरक्षण वॉर्ड येथे घडली. याप्रकरणी 26 डिसेंबर रोजी दाखल तक्रारीवरून नीलेश रमेश तिजारेस नम्रता उर्फ सोनी संजय येवले (रा. नागपूर) यांच्याविरुद्ध गुन्हा नोंद करण्यात आला आहे.
मिळालेल्या माहितीनुसार नीलेश आणि नम्रता यांनी प्रणिता कांबळे (रा. गोरक्षण वॉर्ड) हिला रेल्वेमध्ये नोकरी लावून देतो, असे आमिष दाखविले. यासाठी प्रत्येकाला अडीच लाख रुपये भरण्यास सांगितले. प्रणिता आणि त्यांचा मित्र घेऊन अशा आठ जणांकडून 1 ऑक्टोबर ते 26 डिसेंबर 2023 दरम्यान तब्बल 20 लाख रुपये घेतले. मात्र, पैसे भरूनही नोकरी लावून दिली नाही.
आपली फसवणूक झाल्याचे लक्षात येताच युवकांनी सावंगी पोलिसात तक्रार दिली. याप्रकरणी निलेश तिजारे आणि नम्रता येवले (दोन्ही रा. नागपूर) यांच्या विरुद्ध सावंगी पोलिसात फसवणूकीचा गुन्हा नोंद केला आहे.