
99 th Akhil bhartiya Marathi Sahitya Sammelan vishwas patil live satara news
९९व्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाच्या पूर्वसंध्येला विविध मौलिक ग्रंथांच्या दिंडीमुळे अवघे शहर साहित्यमय होऊन गेले. पारंपरिक वेशभूषेत, अलोट गर्दीमध्ये साहित्यप्रेमी यात सहभागी झाले. उदंड उत्साहात न्हाऊन निघाले. या अनोख्या शब्द-वारीचा आनंद सर्वांनी मनसोक्त घेतला. ग्रंथदिंडी व शोभायात्रेत भारतीय संत परंपरेपासून समाज सुधारकांचे कार्य, भारतीय संस्कृती, लोकसाहित्य तसेच साताऱ्यातील शिक्षण, पर्यटन आणि साहित्य परंपरांचे वैविध्यपूर्ण असे चित्रण दिसून आले.
ऐतिहासिक सातारा नगरीतील राजवाडा या ऐतिहासिक स्थानापासून संमेलनस्थळ असणाऱ्या शाहू मैदानपर्यंत ही ग्रंथदिंडी मोठ्या उत्साहात निघाली. आकर्षक फुलांनी सजवलेल्या पालखीमध्ये लीळाचरित्र, श्री तुकाराम गाथा, सार्थ श्री ज्ञानेश्वरी, भारताचे संविधान, संमेलनाचे नियोजित अध्यक्ष विश्वास पाटील लिखित ‘महासम्राट’ आणि मावळत्या अध्यक्ष डॉ. तारा भवाळकर लिखित ‘सीतायन’ हे ग्रंथ ठेवण्यात आले होते. त्यांचे पूजन करून पालखीने प्रस्थान केले. या वेळी अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाचे नियोजित अध्यक्ष विश्वास पाटील, अखिल भारतीय मराठी साहित्य महामंडळाचे अध्यक्ष प्रा. मिलिंद जोशी, स्वागताध्यक्ष छ. शिवेंद्रराजे भोसले, संमेलनाचे कार्याध्यक्ष विनोद कुलकर्णी, कोषाध्यक्ष नंदकुमार सावंत, कार्यवाह सुनिताराजे भोसले आदी मान्यवर उपस्थित होते. या वेळी काढलेल्या महारथामध्ये विश्वास पाटील, मिलिंद जोशी, छ. शिवेंद्रराजे भोसले विराजमान झाले.
हे देखील वाचा : पत्नी, भाऊ, वहिनी, मुलगा आणि सून सर्वांनाच मिळाली तिकीटं, बीएमसी निवडणुकीत “कुटुंबाला प्राधान्य” देणारे राजकारण समीकरणे बदलली?
संमेलनस्थळी पालखी आल्यानंतर साहित्य संमेलनाध्यक्ष डॉ. तारा भवाळकर, अमेरिकास्थित लेखक व तेथील खासदार श्रीनिवास ठाणेदार, संत साहित्याच्या अभ्यासक डॉ. वंदना मुरकुटे आदींनी पालखीचे स्वागत केले. तब्बल ३३ वर्षांनंतर शतकपूर्व अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलन आयोजित करण्याचा मान महाराष्ट्र साहित्य परिषद पुणे, शाखा शाहूपुरी (सातारा) आणि मावळा फाउंडेशनला मिळाला आहे.
ग्रंथ पालखी संमेलन स्थळाच्या दिशेने निघण्यापूर्वी ग्रंथ दिंडीची सुरुवात मराठमोळ्या शाही पद्धतीने करण्यात आली. यावेळी तुतारीच्या निनादात अब्दागिरी, छत्र्या, झांज पथक अशा सर्वांच्या सहभागाने अस्सल मराठी संस्कृतीचे दर्शन घडविण्यात आले. यावेळी वेद भवन शाही दरबार ऑल इव्हेंट साताराचे १० तुतारी, १० अब्दागिरी, १० छत्र्या, ५० झांज पथक, १० घोडे, ६ वासुदेव सहभागी झाले होते, अशी माहिती सातारा जिल्हा तुतारी वादक जिल्हाध्यक्ष सुहास क्षीरसागर यांनी दिली.
सातारा जिल्ह्यातील एकूण ५५ शाळा व महाविद्यालयांचे चित्ररथ समाविष्ट झालेले होते. प्रत्येक रथामध्ये वैविध्यपूर्ण संकल्पना साकारलेल्या होत्या. चित्ररथांच्या माध्यमातून मराठी संत साहित्यातील सुविचार तसेच मराठी सारस्वतांनी मराठी भाषेच्या योगदानासाठी केलेल्या साहित्य निर्मितीचे दर्शन सर्व साहित्यप्रेमींना घडत होते. मराठी मातीचा अस्सलपणा जोपासताना या ग्रंथदिंडी व शोभायात्रेत पालखी, अबदारी, ढोल-ताशे, लेझीमचे खेळ, वारीचे छोटेखानी दर्शन, बग्गी, घोडेस्वार यांच्यासह सनई-चौघड्यांचे पारंपरिक स्वर मिसळले होते. लेझिम, बँड पथकासह एन. सी. सी. पथकाचाही यात सहभाग होता. या वेळी महाराष्ट्रातील लोककलांचे दर्शनही घडत होते. या ग्रंथदिंडीत रयत शिक्षण संस्था, स्वामी विवेकानंद शिक्षण संस्था, डेक्कन एज्युकेशन सोसायटी, सातारा एज्युकेशन सोसायटी तसेच श्रीमंत छत्रपती प्रतापसिंह हायस्कूल सातारा, डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी ज्या शाळेत शिक्षण घेतले ती शाळा, यशोदा शिक्षण संस्था यांच्यासह विविध मान्यवर शिक्षण संस्थेतील हजारो विद्यार्थी व शिक्षक सहभागी झाले होते.
साहित्य प्रेरणा ज्योत..
सातारा जिल्ह्याला साहित्यिकांची समृद्ध परंपरा लाभली आहे आणि मराठी साहित्य क्षेत्रात या साहित्यिकांचे मोलाचे योगदान आहे. अशा साहित्यिकांच्या स्मृती जागविण्यासाठी आणि नव्या पिढीला त्यांच्या कार्याची महती कळण्यासाठी सातारा जिल्ह्यातील दिवंगत साहित्यिकांच्या निवासस्थानापासून ते संमेलन स्थळापर्यंत ‘साहित्य प्रेरणा ज्योत’ काढण्यात आली. वेद अकॅडमीची मुले यात उत्साहाने सहभागी झाली होती.
संमेलन संरक्षक रथ बनले आकर्षणाचे केंद्र
कुपर कॉर्पोरेशन प्रायव्हेट लिमिटेडने सादर केलेला ‘संमेलन संरक्षक’ या संकल्पनेवर आधारित रथामधील हलता देखावा सर्वांचे लक्ष वेधून घेत होता. या रथात श्यामची आई, श्रीमंत योगी, पानीपत, सर न्यायाधीश कुपर, राऊ, शिकस्त, झेप अशा अनेक गाजलेल्या पुस्तकांचा समावेश करण्यात आला होता. ग्रंथदिंडी व शोभायात्रा जात असताना रस्त्याच्या दुतर्फा उभे राहून नागरिक उत्साहाने स्वागत करीत होते. पुष्पवृष्टी करीत होते. मुख्य चौकांमध्ये या विविध शाळांचे बँड व झांजपथक सहभागी झालेले होते. ग्रंथदिंडीला मानवंदना देण्यासाठी एकूण ५५ शाळा सहभागी झालेल्या होत्या.
वाचन संदेश देणारे लक्षवेधी फलक
वाचनाने माणूस घडतो… समाज बदलतो… वाचनातून माणुसकी फुलते… ग्रंथसंपदा ही समाजाची शक्ती आहे… शब्द पेरले की परिवर्तन उगवते… असे एकापेक्षा एक मौलिक वाचक संदेश देणारे फलक ग्रंथदिंडीमध्ये सर्वांचे लक्ष वेधून घेत होते. कुपर कॉर्पोरेशनच्या माध्यमातून सहभागी स्वयंसेवकांनी गुलाबी फेटे परिधान करून हे लक्षवेधी फलक हाती धरले होते.
हे देखील वाचा : ‘मोदींचा फोन आला तरी आता माघार घेणार नाही’; भाजपमधून उमेदवारी न मिळाल्याने इच्छुक नाराज…
संतांच्या वेशभूषेत शाळकरी विद्यार्थी
संतश्रेष्ठ ज्ञानेश्वर महाराज, जगत्गुरू तुकाराम महाराज, संत नामदेव महाराज, संत कबीर, संत मीराबाई, संत गुरुनानक यांच्या वेशभूषेतील शाळकरी मुलांनी ग्रंथदिंडीत हजेरी लावली. ग्रंथदिंडीतील चित्ररथ लक्षवेधी ठरत होते. यावेळी शिक्षक व नागरिक वारकरी वेशात, डोक्यावर तुळशीवृंदावन, विठ्ठल रखुमाईची प्रतिमा डोक्यावर घेऊन टाळ, मृदंग, चिपळ्यांच्या संगे हरिनाम गात संत साहित्याचे जागर करीत होते.
ग्रंथदिंडी ठरली सातारकरांसाठी ‘सेल्फी पॉईंट’
ग्रंथ दिंडीचा आनंद लुटण्यासाठी नागरिकांची गर्दी होत असतानाच बऱ्याच जणांनी या दिंडीतील रथांसोबत सेल्फी काढण्याचा आणि रिल्स बनवण्याचा आनंद लुटला. श्रेष्ठ संतांसह माँसाहेब जिजाऊ, छत्रपती शिवाजी महाराज, झाशीची राणी लक्ष्मीबाई तसेच थोर समाज सुधारक यांच्या वेशभूषेतील विद्यार्थी, ढोल लेझिमचा खेळ, भारुड, लोकगीत, चित्ररथ अशा सर्व सेल्फी ‘पॉइंट्स’चा सातारकरांनी पुरेपूर आनंद लुटला.
शिवीमुक्त अभियान चर्चेत
ग्रंथदिंडीमध्ये मिम फाउंडेशन ही साताऱ्यातील संस्था सहभागी झालेली होती. या संस्थेचे अनेक स्वयंसेवक विद्यार्थी ‘शिवीमुक्त संवाद साधू या’ हा संदेश देताना दिसत होते. या आगळ्यावेगळ्या अभियानाची खूप चर्चा होती. या संस्थेचे अध्यक्ष आसिफ शेख म्हणाले, आज आपण हा सांस्कृतिक महोत्सव साजरा करीत असताना शिवीमुक्त समाज आणि संवादावरही भर देणे गरजेचे आहे.
माण तालुक्यातील शिक्षकांचे गजनृत्य
एका बाजूला सातारा परिसरातील विविध शाळांचे विद्यार्थी विविध खेळ सादर करत होते तर दुसरीकडे माण तालुक्यातील प्राथमिक शाळांच्या शिक्षकांनी एकत्र येत आजच्या काळात लोप पावत असलेले गजनृत्य सादर करून सर्वांचे लक्ष वेधून घेतले. या शिक्षकांनी लोकगीतावर ठेका धरला. या शिवाय शिक्षकांनी माँसाहेब जिजाऊ, छत्रपती शिवाजी महाराज यांच्यासह मराठा सरदार यांच्या वेशभूषादेखील केल्या होत्या.
ग्रंथदिंडी व शोभायात्रा यशस्वी करण्यासाठी स्वागताध्यक्ष छ. शिवेंद्रसिंहराजे भोसले यांच्या मार्गदर्शनाखाली संमेलनाचे कोषाध्यक्ष नंदकुमार सावंत, ग्रंथदिंडी व शोभायात्रा समितीचे मुख्य समन्वयक दत्तात्रय मोहिते, समिती सदस्य राजकुमार निकम, रवींद्र खंदारे, संमती देशमाने, सचिन सावंत, किरण कदम, उमेश पाटील, ॲड. अनिरुद्ध जोशी, राजू गोडसे, राजेश भोसले, अनंत जोशी यांच्यासह जिल्हा प्रशासन सक्षमपणे कार्यरत होते. त्यांच्या प्रयत्नांनी ही ग्रंथदिंडी व शोभायात्रा यशस्वी झाली.
शोभायात्रेत अवतरले गाडगेबाबा, महात्मा फुले आणि साहित्यरत्ने
चिंध्या शिवून घातलेले कपडे, एका हातात वाडगे तर दुसऱ्या हातात खराटा घेऊन स्वच्छतेचा संदेश देणारे गाडगे महाराज शोभायात्रेत अवतरेलेले दिसले आणि त्यांनी सर्वांचेच लक्ष वेधून घेतले. गाडगेबाबांचा वेश धारण केलेले व्यक्तिमत्त्व म्हणजे प्रा. डॉ. निलेश पाकदुणे. हे पेशाने वाणिज्य शाखेचे वरिष्ठ प्राध्यापक असून ते खास अकलूजहून ग्रंथदिंडीत सहभागी होण्यासाठी आले होते. या शिवाय सावित्रीच्या लेकी या रथामध्ये महात्मा फुले आणि सावित्रीबाई फुले तसेच अन्य रथांतून अनेकानेक साहित्यरत्ने अवतरली. स्वातंत्र्यलढ्यात योगदान देणाऱ्यांनी जी साहित्यनिर्मिती केली त्याचे दर्शन घडवणाराही एक रथ यात सहभागी झालेला होता.