भाजपचे 'मिशन 100+' संकटात; अजित पवारांची 'ही' खेळी ठरतीये अडचणीची
नाशिक : भाजपमध्ये गेल्या काही दिवसांपासून उमेदवारीवरून सुरू असलेल्या नाराजीचे रूपांतर आता उघड बंडखोरीत झाले आहे. उमेदवारी नाकारल्याने नाराज झालेले तरुण नेते अमित घुगे यांनी पक्षाविरोधात भूमिका घेत अपक्ष उमेदवार म्हणून निवडणूक लढवण्याची घोषणा केली आहे. यासंदर्भात त्यांनी पत्रकार परिषद घेत भाजपच्या कार्यपद्धतीवर तीव्र शब्दांत टीका केली.
घुगे हे गेल्या २० वर्षांपासून भाजपमध्ये सक्रिय असून मोर्चे, आंदोलने तसेच संघटनवाढीसाठी त्यांनी काम केले आहे. प्रभाग क्रमांक १ (ड) ही जागा यंदा सर्वसाधारण ठेवण्यात आली असून २०१७ पासून आपण सातत्याने पक्षाकडे उमेदवारीची मागणी करत होतो, असे त्यांनी सांगितले. सरचिटणीस पदावर कार्यरत असताना उमेदवारीची मागणी न्याय्य होती, असा दावाही त्यांनी केला. पक्षाने दिलेल्या आश्वासनांना फाटा देत आमदार राहुल ढिकले आणि शहराध्यक्ष सुनील केदार यांच्यासह भाजप निवड समितीच्या उपस्थितीत ७० वर्षीय उमेदवाराला तिकीट देण्यात आले. ज्यांना प्रभागात फिरणेही कठीण जाते, अशा व्यक्तीच्या हाती नेतृत्व देणे म्हणजे तरुण कार्यकर्त्यांचा अपमान आहे, असा आरोप घुगे यांनी केला.
हेदेखील वाचा : Maharashtra Politics : धनंजय मुंडे यांचे मंत्रिमंडळात लवकरच ‘कमबॅक’? कोर्टाकडून दिलासा मिळताच चर्चांना उधाण
दरम्यान, निकाल काहीही लागो, मी निवडणूक लढवणारच, असा ठाम निर्धार त्यांनी व्यक्त केला. उमेदवारीबाबत चर्चा करण्यासाठी संपर्क साधला असता शहराध्यक्षांनी फोनही उचलला नाही, असा आरोपही त्यांनी केला. या प्रकरणात नामदार गिरीश महाजन यांचा कोणताही हस्तक्षेप नसल्याचेही त्यांनी स्पष्ट केले.
पक्षात निष्ठावानांचा अपमान
पक्षात सामाजिक समीकरणांच्या नावाखाली निष्ठावानांचा अपमान केला जात आहे. कार्यकर्त्यांनी केविलवाणे प्रदर्शन करणे थांबवावे. सरचिटणीसपदाचा राजीनामा मी आज (दि. २) रोजी सकाळी ११ वाजता सादर करणार आहे. आता पंतप्रधान मोदींनी फोन केला तरी माझा निर्णय बदलणार नाही. पक्षाची कार्यपद्धती चुकीची आहे. घुगे यांच्या या आक्रमक भूमिकेमुळे पंचवटीतील संबंधित प्रभागातील राजकीय समीकरणे ढवळून निघण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.
हेदेखील वाचा : Maharashtra Politics : “धनंजय मुंडेंना मंत्रिपद दिलं तर…; अमित शाहांच्या भेटीवर सुप्रिया सुळेंनी व्यक्त केली तीव्र नाराजी






