पुणे : कोरेगाव पार्क भागातील ओशो आश्रमाच्या गेटवर बेकायदेशीररित्या जमाव जमवत आश्रमाच्या मॅनेजमेंटविरोधात घोषणाबाजी करून आश्रमात प्रवेश करण्याचा प्रयत्न केल्याप्रकरणी पोलिसांनी सुमारे सव्वाशे अनुयायांवर गुन्हा दाखल केला आहे. दरम्यान, पोलिसांना धक्काबुक्की केल्याप्रकरणात एकावर दुसरा स्वतंत्र गुन्हा नोंद करण्यात आला आहे.
ओशो आश्रमाच्या वतीने धनेशकुमार रामकुमार जोशी उर्फ स्वामी ध्यानेश भारती (वय ६५, रा. बंगला नं. १७, ओशो आश्रम ग नं. 1) यांनी तक्रार दिली आहे. त्यानुसार, प्रमोद त्रिपाठी उर्फ प्रेम पारस, सुनिल मिरपुरी उर्फ स्वामी चैतन्य किर्ती, गोपाल दत्त भारती उर्फ स्वामी गोपाल भारती, राजेध वाधवा उर्फ स्वामी ध्यान अनुग्रह, किशोर लाभशंकर रावल उर्फ स्वामी प्रेम अनादी, जगदीश शर्मा उर्फ स्वामी अमन विस्मय, आरी राजदान उर्फ कुनिका भट्टी, न्यु इंडिया न्युजचा प्रतिनिधी वैभवकुमार पाठक यांच्यासह इतर १०० ते १२० अनुयायांवर गुन्हा नोंद केला आहे. तर पोलिसांना धक्काबुक्की केल्याप्रकरणी पोलीस नाईक गोकुळ कन्हैयालाल परदेशी (५०) यांनी तक्रार दिली आहे. त्यावरून एकावर स्वतंत्र गुन्हा नोंद केला आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, ओशो आश्रमाचे मॅनेजमेंट आणि अनुयायांच्यात मोठे वाद सुरू आहेत. बुधवारी सकाळी ओशो आश्रमाच्या गेटसमोर मोठया प्रमाणावर अनुयायी जमले. त्यांनी मोठ-मोठयाने घोषणाबाजी केली तसेच बेकायदा आश्रमात प्रवेश करण्याचा प्रयत्न केला. ट्रस्टच्या सदस्य साधना यांना धक्काबुक्की झाली. तर एका माध्यमाचे प्रतिनिधी वैभवकुमार पाठक यांनी पत्रकार असल्याचे सांगत आश्रमात प्रवेश करण्याचा प्रयत्न केला. त्यावेळी अनुयायांनी जोशी यांना धक्काबुक्की केल्याचा आरोपी करण्यात आला आहे. वरूण विनती रावलने घोषणाबाजी करत धनेशकुमार जोशी यांच्याशी वाद घोतला. त्यावेळी पोलिसांनी त्यास समजावुन सांगितले. तरीही रावलने वाद घालून पोलिसांना धक्काबुक्की केली. प्रकरणाचा अधिक तपास कोरेगाव पार्क पोलीस करीत आहेत.