तीन महिन्याचे वेतन काढण्यासाठी मागितली 40 हजार रुपयांची लाच, उप शिक्षकाविरोधात गुन्हा दाखल
सध्या देशातील भ्रष्टाचाराची प्रकरण मोठ्या प्रमाणात वाढली आहेत. रायगड जिल्ह्यातील विविध विभागात भ्रष्टाचाराची अनेक प्रकरण उघडकीस आली आहेत. त्यानंतर आता पुन्हा रायगडमधून भ्रष्टाचाराचं एक प्रकरण समोर आलं आहे. ४० हजार रुपयांची लाच मागितल्या प्रकरणी एका उप शिक्षकाविरोधात गुन्हा देखील दाखल करण्यात आला आहे. अमित राजेश पंडया असं या उप शिक्षकाचं नाव आहे. खालापूर पोलीस ठाण्यात अमित राजेश पंडया यांच्याविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
हेदेखील वाचा- पुण्यात झालेल्या हत्येचे आरोपी मानपाडा पोलिसांच्या ताब्यात, आरोपींचा बिहारला पळून जाण्याचा डाव लावला उधळून
रायगड जिल्ह्यात चार शिक्षकांचे प्रलंबित पगार काढण्यासाठी अमित राजेश पंडया (वय ४७ वर्षे,रा. अलिबाग रायगड) यांनी ४० हजार रुपयांची लाच मागितली. अमित राजेश पंडया पनवेल येथील प्रथामिक शाळा जाताडे येथे उप शिक्षक व म्हणून कार्यरत होते. त्यानंतर आता समन्वयक प्राथमिक शिक्षण विभाग, रायगड जिल्हा परिषद, अलिबाग, जिल्हा रायगड येथे कार्यरत आहे. ते रूम क्रमांक A-१२०३, बारावा माळा, नीलसिद्धी इन्फिनिटी, सेक्टर ११, खांदा कॉलनी तालुका पनवेल जिल्हा रायगड येथील रहिवासी आहे. अमित राजेश पंडया यांना लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने जुन्या मुंबई-पुणे हायवेवर खालापुर फाटा, ता. खालापुर येथे ताब्यात घेतले असून याबाबत खालापूर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
हेदेखील वाचा- भिवंडीत गणपती विसर्जनाच्या वेळी मूर्तीवर दगडफेक, विसर्जन मिरवणुकीत गोंधळ, पोलिसांचा लाठीचार्ज
याबाबत सविस्तर माहिती अशी की, रायगड जिल्हा परिषदेच्या प्राथमिक शिक्षण विभागात तक्रारदार हे शिक्षक म्हणुन कार्यरत असुन, तक्रारदार व त्यांच्या सोबतचे इतर तीन शिक्षक यांचे माहे जुन २०२४ व जुलै २०२४ या कालावधीचे वेतन अदा करणे बाबतचे आदेश रायगड जिल्हा परिषदेच्या प्राथमिक शिक्षणाधिकारी यांच्या कार्यालयाकडुन निघणेकरीता लोकसेवक अमित राजेश पंडया यांनी ४०,००० रूपये लाचेची मागणी करीत असल्याची तक्रार प्राप्त झाली होती.
तक्रारदार यांनी लाच लुचपत प्रतिबंधक विभाग रायगड यांच्या कार्यालयाकडे केलेल्या अनुषंगाने पडताळणीच्या वेळी दि.०४/०९/२०२४ रोजी १९.१० ते १९.५७ वाजण्याच्या दरम्यान तक्रारदार यांचेकडे पनवेल बस स्थानक येथे ४०,००० रूपये लाचेची मागणी करून लाचेची रक्कम तात्काळ स्विकारण्याचे मान्य केले. त्यानंतर दि.०४/०९/२०२४ रोजी २०.४६ वाजता लोकसेवक अमित पंडया यांच्याविरूध्द सापळा आयोजित केला असता, लोकसेवक यांना संशय आल्याने त्यांनी लाचेची रक्कम स्विकारली नाही. त्यामुळे त्यादिवशी सापळा स्थगित करण्यात आला. त्यानंतर दिनांक १८/०९/२०२४ रोजी १७.४५ वाजता जुन्या मुंबई-पुणे हायवेवर खालापुर फाटा, ता. खालापुर येथे सापळा आयोजित केला असता, लोकसेवक अमित पंडया यांना तक्रारदार यांच्याकडून ४०,००० रूपये लाचेची रक्कम स्विकारताना पंचासमक्ष रंगेहाथ पकडण्यात आले आहे.
सदर कारवाई ही लाच लुचपत प्रतिबंधक विभाग ठाणे परिक्षेत्र अधीक्षक सुनील लोखंडे, अप्पर अधीक्षक महेश तरडे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस उप अधीक्षक शशिकांत पाडावे, सहाय्यक फौजदार अरूण करकरे, पोलीस हवालदार महेश पाटील, पोलिस नाईक सचिन आटपाडकर, चालक पोलीस हवालदार सागर पाटील यांच्या पथकाने केली आहे.