भिवंडीत गणपती विसर्जनाच्या वेळी मूर्तीवर दगडफेक, विसर्जन मिरवणुकीत गोंधळ, पोलिसांचा लाठीचार्ज (फोटो सौजन्य - pinterest)
महाराष्ट्रात काल 10 दिवसांच्या गणपतीचं भक्तिभावाने विसर्जन करण्यात आलं. संपूर्ण महाराष्ट्रात काल उत्साहाचं वातावरण होतं. ढोल ताशांच्या गजरात आपल्या लाडक्या बाप्पाला निरोप देण्यासाठी भाविकांचा जनसागर उसळला होता. महाराष्ट्रात काल भक्तिमय वातावरण निर्माण झालं होतं. मात्र यावेळी भिवंडीमध्ये एक दुर्दैवी घटना घडली. भिवंडी परिसरात सुरु असलेल्या गणपती विसर्जनाच्या वेळी काही अज्ञातांकडून मूर्तीवर दगडफेक करण्यात आली. यामुळे विसर्जन मिरवणुकीत प्रचंड गोंधळ निर्माण झाला होता. तसेच या संपूर्ण परिस्थितीतवर नियंत्रण मिळवण्यासाठी पोलिसांनी लाठीचार्ज केला. शिवाय काही लोकांना ताब्यात घेण्यात आलं पुढील तपास सुरु आहे.
हेदेखील वाचा- गणेशोत्सवात मुंबईकरांचा उत्साह शिगेला, पहिल्याच दिवशी लालबागच्या राजाच्या दानपेटीत एवढी रक्कम जमा
भिवंडीमध्ये काल मोठ्या थाटामाटात गणपती विसर्जन करत 10 दिवसांच्या बाप्पाला निरोप देण्यात आला. दरवर्षीप्रमाणे यंदाही वंजारपट्टी नाका येथील हिंदुस्थानी मशिदीबाहेर मंडप उभारण्यात आला होता. यावेळी मोहल्ला कमिटी, पोलीस आणि गणेश मंडळांचे कार्यकर्ते येणाऱ्या भाविकांचे स्वागत करत होते. रात्री बारा वाजण्याच्या सुमारास गणेशाची मोठी मूर्ती नाडी नाका घुघाट नगर येथून कामवारी नदीकडे विसर्जनासाठी नेण्यात येत होती. गणेशाची मोठी मूर्ती वंजारपट्टी नाक्यावरून जात असताना काही अज्ञात तरुणांनी मूर्तीवर दगडफेक केल्याचं सांगितलं जात आहे. या घटनेत गणेशाच्या मोठ्या मूर्तीचं काहीस नुकसान झालं.
या घटनेनंतर मंडळाच्या लोकांनी घटनास्थळी गोंधळ घालण्यास सुरुवात केली. दरम्यान, यावेळी एका तरुणाला जमावाने पकडून मारहाण करून पोलिसांच्या ताब्यात दिले. जोपर्यंत सर्व दगडफेक करणाऱ्यांना पोलिस पकडत नाहीत तोपर्यंत मूर्तीचे विसर्जन केले जाणार नाही, अशी मागणी मूर्ती विसर्जनाच्यावेळी मंडळाच्या लोकांनी केली होती. त्यामुळे परिसरात तणाव निर्माण झाला होता.
हेदेखील वाचा- Ganesh Chaturthi 2024: आज दीड दिवसांच्या गणपतींच विसर्जन; समुद्रात उतरताना खबरदारी द्या, प्रशासनाचे आवाहन
घटनेची माहिती मिळताच इतर काही विभागातील लोक तेथे आले आणि जय श्री रामच्या घोषणा देऊ लागले. काही वेळातच दोन्ही समाजातील लोकांची गर्दी वाढून तणावाचे वातावरण निर्माण झाले होते. परिस्थिती बिघडलेली पाहून डीसीपी, एसीपी आणि वरिष्ठ पोलीस कर्मचारी यांच्यासह पोलीस कर्मचारी मोठ्या संख्येने घटनास्थळी दाखल झाले. सुरुवातीला स्पष्टीकरण देण्यात आले, मात्र आरोपींना अटक करण्याची मागणी करत जोपर्यंत आरोपीला अटक होत नाही तोपर्यंत गणपती विसर्जन करणार नसल्याचा निर्णय मंडळाच्या कार्यकर्त्यांनी घेतला होता.
यावेळी पोलीस आणि जमावामध्ये बाचाबाची देखील झाली. परिस्थितीत अनियंत्रित होत असल्याचा लक्षात येताच पोलिसांनी जमावाला शांत करण्याचा प्रयत्न केला. मात्र तणाव वाढत असल्याचे पाहून पोलिसांनी अखेर लाठिमार करण्याचा निर्णय घेतला. यामध्ये अनेकडजण जखमी झाल्याचं सांगितलं जात आहे.
अतिरिक्त आयुक्त ज्ञानेश्वर चव्हाण यांनी सांगितलं की, पोलिसांनी केलेल्या लाठीमारात अनेकजण जखमी झाले. मात्र यानंतर परिस्थितीवर नियंत्रण मिळवणं शक्य झालं. कारण नागरिकांमधील तणाव सतत वाढत होता. यानंतर काही पोलीस कर्मचारी त्यांच्या समर्थकांसह घटनास्थळी पोहोचले आणि प्रकरण शांत करण्याचा प्रयत्न केला. त्यानंतर सर्व लोकांनी शिवाजी चौकात एकत्र येऊन पुढील कारवाईची मागणी केली. कोणतीही घटना घडू नये म्हणून मोठ्या संख्येने लोक हाफिज दर्ग्यात पोहोचले, तसेच पोलीस कर्मचारीही उपस्थित होते. यावेळी काही जणांना ताब्यात घेण्यात आलं असून पुढील तपास सुरु आहे. गुन्हा दाखल झाल्यानंतर तपास सुरू असून जो दोषी आढळेल, त्याच्यावर कठोर कारवाई केली जाईल. सध्या भिवंडीतील वातावरण शांत आहे. शहरात चोख पोलिस बंदोबस्त ठेवण्यात आला आहे.