काँग्रेसचा बडा नेता शिंदेंच्या शिवसेनेत जाणार; पक्षप्रवेशाची तारीखही ठरली
अक्कलकोट : शिवसेना शिंदे गटाचे प्रमुख तथा राज्याचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे पाच जून रोजी अक्कलकोटच्या दौऱ्यावर येत आहेत. काँग्रेस पक्षाचे नेते माजी गृहराज्यमंत्री सिद्धाराम म्हेत्रे शिवसेना शिंदे गटात प्रवेश करणार आहेत. शिवसेना शिंदे गट जिल्ह्यात माजी गृहराज्यमंत्री सिद्धाराम म्हेत्रे व काँग्रेसचे माजी तालुकाध्यक्ष शंकर म्हेत्रे यांच्या नेतृत्वात उभारी घेण्याची शक्यता आहे. या दाैऱ्यात उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे काेणती घोषणा करतात,? याकडे अक्कलकोट तालुकावासियांचे लक्ष लागले आहे.
सात विधानसभा निवडणुकीचा प्रचंड अनुभव असलेले काँग्रेस पक्षाचे ज्येष्ठ नेते, माजी गृहराज्यमंत्री सिद्धाराम म्हेत्रे यांनी काँग्रेस पक्ष सोडत शिवसेना शिंदे गटात कार्यकर्त्यांसह प्रवेश करणार असल्याचे जाहीर केले. माजी मंत्री म्हेत्रे यांनी उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची सात वेळा भेट घेऊन चर्चा केली. त्यानंतर शिवसेना शिंदे गटात प्रवेश करण्याचा निर्णय घेतला. त्यांच्या निर्णयामुळे कॉंग्रेस पक्षाला तालुक्यात मोठा फटका बसण्याची शक्यता आहे. पक्षप्रवेशाचा कार्यक्रम मंगरूळ प्रशाले समोरील मैदानावर होणार आहे. या कार्यक्रमाची तयारी सुरू करण्यात आली असून मैदानाची स्वच्छता, मंडप उभारण्याच्या कामास सुरुवात करण्यात आली आहे.
जिल्ह्याची मोठी जबाबदारी साेपविणार
माजी मंत्री सिद्धाराम म्हेत्रे, त्यांचे बंधू काँग्रेसचे माजी तालुकाध्यक्ष शंकर म्हेत्रे यांच्या पक्षप्रवेश कार्यक्रमाकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. राज्याचे उपमुख्यमंत्री व शिवसेना शिंदे गटाचे प्रमुख एकनाथ शिंदे अक्कलकोटच्या दौऱ्यात काय मोठी घोषणा करतात, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. शिवसैनिकांत उर्जा निर्माण करण्यासाठी शिंदे माजी मंत्री सिद्धाराम म्हेत्रे यांच्यावर जिल्ह्याची मोठी जबाबदारी देण्याची शक्यता आहे.
राजकीय पटलावर काय बदल हाेणार?
उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे अक्कलकोट निवासी श्री स्वामी समर्थांचे निस्सीम भक्त आहेत. तीर्थक्षेत्र अक्कलकोट नगरीच्या विकासासाठी भरीव निधीची घोषणा करणार का ? याकडे अक्कलकोटकरांचे लक्ष लागले आहे. माजी मंत्री म्हेत्रे यांच्या पक्षप्रवेश कार्यक्रमात कोणकोणते नेते त्यांच्यासोबत शिवसेना शिंदे गटात प्रवेश करणार, याकडे जनतेचे लक्ष लागले आहे. म्हेत्रे यांच्या प्रवेशाने अक्कलकोटसह सोलापूर जिल्ह्याच्या राजकीय पटलावर काय बदल होणार, याची मोठी उत्सुकता नागरिकात आहे.