
Sangli News : बिऊरमध्ये बिबट्याची बालकावर झडप; काही क्षणांतच झालं होत्याचं नव्हतं
शिराळा : बिऊर (ता शिराळा) च्या अमृतनगर येथे बिबट्याच्या हल्ल्यात राजवीर हणमंत पाटील (वय ६) या बालकाचा मृत्यू झाला. ही घटना शुक्रवारी (दि.३०) सायंकाळी सातच्या सुमारास घडली. घटना घडल्यानंतर ग्रामस्थांनी वन विभागाला अनेकवेळा फोन लावला तरीही कुणीही फोन उचलला नाही. त्या कारणाने संतप्त हजारोच्या जमावाने वन विभागाचे कार्यालय फोडले.
यावेळी घटनास्थळावरून मिळालेली माहिती अशी, राजवीर व त्याची लहान बहीण कार्तिकी (वय ४) आपल्या घरातून शेजारी घरात खेळत जात असताना अचानक बिबट्याने राजवीरवर हल्ला केला. त्यावेळी सोबत असणारी बहीण ओरडल्याने घरातील लोक व नागरिक जमा झाले. तोपर्यंत बिबट्याने राजवीरला गळ्याला धरून सुमारे पाचशे फुटावर शंकर केरु पाटील यांच्या शेतापर्यंत फरफटत नेले. त्यावेळी पंडित शंकर पाटील, बजरंग पांडुरंग पाटील, शशिकांत पाटील, कृष्णात पाटील, महादेव भीमराव पाटील, पोपट पाटील, राजू शंकर पाटील, रमेश पाटील, राजेंद्र पाटील, अक्षय पाटील यांनी बिबट्याचा पाठलाग केला असता ओढ्यालगत राजवीरचे चुलत आजोबा शंकर श्रीपती पाटील यानी बॅटरीच्या झोतात पाहिले असता त्यावेळी राजवीर जख्मी अवस्थेत आढळून आला.
दरम्यान, या काळात तिथून बिबट्याने धूम ठोकली. जखमी राजवीरला शिराळा उपजिल्हा रुग्णालयात दाखल केले असता तो मृत झाल्याचे डॉक्टरांनी घोषित केले. शवविच्छेदन डॉ. दीपक बनसोडे यांनी केले.
राजवीरचा मृत्यू झाल्याचे समजताच जमाव संतप्त
राजवीर मृत झाल्याने जमाव संतप्त झाला होता. त्यातच वनविभागाचे कर्मचारी फोन उचलत नव्हते. त्यामुळे जमावाने वन विभागाचे भुईकोट किल्ला परिसरात असणारे कार्यालय फोडले. त्यामध्ये जमावाने कार्यालयाचे दार, खिडक्या फोडल्या. तसेच लोखंडी गेट ही उपसून फेकून दिले. यावेळी माजी राज्यमंत्री शिवाजीराव नाईक, आमदार सत्यजित देशमुख, माजी आमदार मानसिंगराव नाईक, रणधीर नाईक, रेणुकादेवी देशमुख, सम्राट नाईक, विराज नाईक, सत्यजित नाईक, तहसीलदार श्यामला खोत पाटील, उपविभागीय पोलीस अधिकारी अरुण पाटील, पोलिस निरीक्षक जंबाजी भोसले, साई तेजस्वी देशमुख, सुखदेव पाटील, नगराध्यक्ष पृथ्वीसिंग नाईक, भूषण नाईक, विश्वास कदम, बंटी नांगरे पाटील उपस्थित होते.
रात्री अकरा वाजता उपजिल्हा रुग्णालयाला भेट
सहाय्यक वनसंरक्षक नवनाथ कांबळे, उपवनसंरक्षण सागर गवते, प्रांतधिकारी श्रीनिवास अर्जुन यांनी रात्री ११ वाजता उपजिल्हा रुग्णालयाला भेट दिली. रात्री उशिरापर्यंत आमदार सत्यजित देशमुख, माजी राज्यमंत्री शिवाजीराव नाईक, माजी आमदार मनसिंगराव नाईक, तहसीलदार शामला खोत रुग्णालयात बसून होते. पोलिस यंत्रणा प्रयत्न करत होती. मात्र, संतप्त जमाव शांत होत नव्हता. अखेर अधिकारी व लोकप्रतिनिधी यांनी समजूत काढल्याने रात्री पावणे बारानंतर शवविच्छेदनास परवानगी देण्यात आली. त्यानंतर रात्री १२ वाजता जमाव पांगला.
वन कर्मचाऱ्यांच्या निलंबनाचा प्रस्ताव
वनक्षेत्रपाल एकनाथ पारधी यांच्यासह शिराळा कार्यालयातील सर्व वन कर्मचाऱ्यांच्या निलंबनाचा प्रस्ताव नागपूरला पाठवला आहे. त्याला सोमवारपर्यंत मंजुरी मिळेल, असे प्रांताधिकारी श्रीनिवास अर्जुन यांनी सर्व प्रक्षोभक ग्रामस्थांशी बोलताना स्पष्ट केले. त्यानंतर ग्रामस्थांनी राजवीरच्या शव विच्छेदनासाठी अनुमती दिली. जमाव शांत झाला.
नागरिकांची तातडीने धाव
हल्ला केलेला बिबट्या चौथ्यांदा सव्वानऊच्या दरम्यान याच परिसरात आला. यामुळे नागरिकांनी या ठिकाणी धाव घेतली. लोकांच्यात भीतीचे वातावरण तयार झाले आहे.
हेदेखील वाचा : Gondia News: गोंदियात बिबट्याचा धुमाकूळ! चार वर्षीय चिमुकल्यावर हल्ला करून ठार, जंगलव्याप्त गावांमध्ये दहशतीचे वातावरण