
मानव–बिबट संघर्ष रोखण्यासाठी जुन्नर वनविभागाकडून उपक्रम; आपत्तकालीन दलास विशेष प्रशिक्षण
डेहराडून येथील भारतीय वन्यजीव संस्थेने केलेल्या अभ्यासानुसार, जुन्नरसह आसपासच्या भागात प्रति १०० चौरस किलोमीटर क्षेत्रात सहा ते सात बिबट्यांची घनता आढळून आली आहे. या पार्श्वभूमीवर बिबट हल्ल्यांचा धोका कमी करणे, तत्पर प्रतिसाद देणे, मदत व बचाव कार्य अधिक प्रभावी करणे यासाठी हे प्रशिक्षण आयोजित करण्यात आले.
आशिष ठाकरे (वनसंरक्षक, पुणे) यांच्या संकल्पनेतून आणि उप वनसंरक्षक प्रशांत खाडे यांच्या मार्गदर्शनाखाली या प्रशिक्षणाची सुरुवात करण्यात आली. जुन्नर वनविभागाचे बहुतांश क्षेत्र डोंगराळ असून घोड व कुकडी प्रकल्पांतर्गत डिंभे, माणिकडोह, पिंपळगाव जोगा, वडज, चिल्हेवाडी, चासकमान अशा धरणांमुळे सिंचन सुविधा वाढल्या आहेत. परिणामी ऊस, केळी, द्राक्ष, डाळिंब यांसारख्या बागायती पिकांचे क्षेत्र वाढले. या पिकांमुळे बिबट्यांना लपण्यासाठी अनुकूल अधिवास व भक्ष्य सहज उपलब्ध होत आहे.
या प्रशिक्षणात जुन्नर, ओतूर, मंचर, घोडेगाव, खेड, चाकण व शिरूर वनपरिक्षेत्रातील आपत्तकालीन प्रतिसाद दलाचे ५१ सदस्य तसेच वनविभागाचे २८ क्षेत्रीय कर्मचारी सहभागी झाले. रेस्क्यू चॅरिटेबल ट्रस्ट, पुणे येथील तज्ज्ञांकडून प्रात्यक्षिकांद्वारे प्रशिक्षण देण्यात आले.
कॅमेरा ड्रोनच्या वापराचे प्रात्यक्षिक
रेस्क्यू चॅरिटेबल ट्रस्टचे नचिकेत उत्पात व किरण रहाळकर यांनी बिबट्याचा शोध व नियंत्रण, माग काढणे, पिंजरे लावणे, ट्रॅप कॅमेरे व ड्रोनचा वापर याबाबत मार्गदर्शन केले. तसेच नचिकेत अवधानी आणि श्रेयस कांबळे यांनी अंधार, ऊसशेती व दाट झाडीत शोध सुलभ करण्यासाठी थर्मल कॅमेरा ड्रोनच्या वापराचे प्रात्यक्षिक दाखवले.
प्रतिबंधात्मक उपाययोजनाबाबत मार्गदर्शन
बिबट हल्ल्याच्या प्रसंगी आपत्तकालीन प्रतिसाद दलाची भूमिका, घटनास्थळी तात्काळ पोहोचणे, वनविभाग, पोलिस व आरोग्य विभागाशी समन्वय, नागरिकांची सुरक्षितता, जखमींना वैद्यकीय मदत, जनजागृती व प्रतिबंधात्मक उपाययोजना याबाबत सविस्तर मार्गदर्शन करण्यात आले. प्रशिक्षण कार्यक्रमाचे प्रास्ताविक सहाय्यक वनसंरक्षक अमृत शिंदे यांनी केले तर सहाय्यक वनसंरक्षक स्मिता राजहंस यांनी आभार मानले. यावेळी वनपरिक्षेत्र अधिकारी प्रदीप चव्हाण (जुन्नर), चैतन्य कांबळे (ओतूर), यश जाधव (खेड), विकास भोसले (मंचर), कुणाल लिमकर (घोडेगाव) तसेच मानद वन्यजीव रक्षक धनंजय कोकणे आदी उपस्थित होते.