पुणे : वानवडी परिसरातील सार्वजनिक कचराकुंडीत पुरूष जातीचे जिवंत अर्भक (Newborn Baby Found) आढळून आले. त्याला फेकून दिल्याने परिसरात खळबळ उडाली आहे. ही घटना गुरूवारी उघडकीस आली आहे. अनैतिक संबंधातून अर्भक जन्मल्याने त्याला फेकून दिल्याचा अंदाज पोलिसांनी वर्तविला आहे.
याप्रकरणी वानवडी पोलिस ठाण्यात ४१ वर्षीय महिलेने तक्रार दिली आहे. त्यानुसार, अज्ञाताविरोधात गुन्हा दाखल केला आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, तक्रारदार महिला कॅन्टोन्मेंटमध्ये साफसफाई करण्याचे काम करतात. गुरूवारी त्या काम करत असताना त्यांना सकाळी सातच्या सुमारास घोरपडी बाजार परिसरातील कचराकुंडीत अर्भक रडत असल्याचा आवाज आला. त्यांनी तत्काळ कचराकुंडीत पाहिले असता, त्यांना नुकतेच जन्मलेले पुरूष जातीचे अर्भक दिसून आले. त्यांनी तत्काळ पोलिसांशी संपर्क साधला. वानवडी पोलिसांनी घटनास्थळी धाव घेत या बाळाला ससून रुग्णालयात दाखल केले.
दरम्यान, या घटनेची माहिती वाऱ्यासारखी पसरली. त्यावेळी नागरिकांनी घटनास्थळी एकच गर्दी केली होती. त्याला ससून रूग्णालयात दाखल केले असून, त्याची प्रकृती स्थिर असल्याचे सांगण्यात आले. अधिक तपास वानवडी पोलीस करत आहेत.