कदमवाकवस्ती येथील गोडाऊनला भीषण आग; तब्बल 2 कोटींच्या इलेक्ट्रॉनिक्स वस्तू जळून खाक
कदमवाकवस्ती : हवेली तालुक्यातील कदमवाकवस्ती ग्रामपंचायत हद्दीतील पुणे–सोलापूर महामार्गालगत असलेल्या जे के सेल्स या इलेक्ट्रॉनिक्स वस्तू विक्री केंद्राच्या गोडाऊनला रविवारी रात्री उशिरा भीषण आग लागली. वायरचे शॉर्टसर्किट झाल्याने लागलेल्या या आगीत अंदाजे दोन कोटी रुपयांहून अधिक किमतीच्या इलेक्ट्रॉनिक्स वस्तू जळून खाक झाल्या आहेत. ऐन दिवाळीत या घटनेमुळे व्यावसायिकांवर मोठे आर्थिक संकट कोसळलं आहे.
सदर गोडाऊन मधुबन मंगल कार्यालयाच्या मागे, शिवम हॉस्पिटल परिसरात आहे. ही घटना रविवार (१९ ऑक्टोबर) रोजी रात्री सव्वा दहाच्या सुमारास घडली. जे.के सेल्स हे दुकान अक्षय काळभोर व फिरोज खान मेटकरी यांनी भागीदारीत सुरू केले असून, येथे टीव्ही, फ्रिज, वॉशिंग मशीन, एसी, कुलर, फॅन, गिझर, फिल्टर यांसारख्या वस्तूंची विक्री केली जाते.
दिवाळीनिमित्त विक्रीसाठी गोडाऊनमध्ये सुमारे ३५९ फ्रिज, ५० टीव्ही, ९० वॉशिंग मशीन, ७० एसी, ४० कुलर, १२ पिठाच्या गिरण्या, ५ फॅन, ४९ गिझर आणि २५ फिल्टर असा मोठा साठा ठेवण्यात आला होता. रात्री परिसरातील काही नागरिकांनी वायर जळताना पाहून माहिती दिल्यानंतर संचालक घटनास्थळी पोहोचले, तेव्हा गोडाऊनच्या शटरमधून धूर व आगीचे ज्वाळा बाहेर पडत होत्या.
स्थानिकांनी पाणी मारून आग आटोक्यात आणण्याचा प्रयत्न केला; मात्र काही क्षणातच आगीने भयानक रौद्र रूप धारण केले. यादरम्यान एका फ्रीजमधील गॅसचा स्फोट झाल्याने आगीची तीव्रता आणखीनच वाढली. घटनेची माहिती मिळताच हडपसर येथील अग्निशमन दल घटनास्थळी दाखल झाले. दोन गाड्यांच्या मदतीने जवानांनी सुमारे दोन तासांच्या प्रयत्नांनंतर आग आटोक्यात आणली.
परंतु तोपर्यंत गोडाऊनमधील सर्व वस्तू जळून खाक झाल्या होत्या. प्राथमिक अंदाजानुसार दोन कोटी रुपयांहून अधिक किमतीच्या वस्तूंचे नुकसान झाले आहे. विशेष म्हणजे, मागील महिन्यात झालेल्या अतिवृष्टीत या व्यावसायिकांच्या तीन दुकानांमध्ये – जेके फर्निचर, जेके सेल्स इलेक्ट्रॉनिक्स आणि आर वर्ड इंटरियर मॉड्युलर फॅक्टरी – पाणी शिरून सुमारे तीन कोटी रुपयांचे नुकसान झाले होते. त्यातच आता आगीच्या घटनेमुळे एकूण पाच कोटी रुपयांचा फटका बसल्याचे समोर आले आहे.
“ऐन दिवाळीत झालेल्या या आगीमुळे आम्ही आर्थिक गर्तेत सापडलो आहोत. विमा कंपन्यांनी तातडीने पंचनामा करून योग्य नुकसान भरपाई द्यावी आणि बँकांनी कर्जफेडीसाठी मुदतवाढ द्यावी,” – अक्षय काळभोर व फिरोज खान मेटकरी (नुकसानग्रस्त व्यावसायिक)