
कोल्हापूरच्या शहापुरात गॅस सिलेंडरचा भीषण स्फोट;
इचलकरंजी : शहापूर येथील अवधुतनगरमध्ये घरगुती गॅस सिलेंडरचा भीषण स्फोट झाला. या झालेल्या दुर्घटनेत एक वृद्ध गंभीररित्या जखमी झाला आहे. हा स्फोट इतका भीषण होता की, या स्फोटात घर आणि प्रांपचिक साहित्याचे मोठे नुकसान झाले आहे. अचानक झालेल्या या स्फोटामुळे परिसरात भीतीचे वातावरण होते.
रामनवमी बिरबल यादव (वय ६६, सध्या रा. शहापूर, मूळ रा. बिहार) असे या स्फोटात गंभीर जखमी झालेल्या वृद्धाचे नाव आहे. स्फोटात अवधुतनगर येथे गोपाल रामा कोष्टी यांच्या मालकीच्या खोलीत रामनवमी यादव हे अनेक वर्षांपासून भाड्याने वास्तव्यास आहेत. ते घरात एकटेच असल्याने नेहमीप्रमाणे सकाळी उठून स्नान केल्यावर चहा करण्यासाठी ते गॅस पेटवत असताना आधीच झालेल्या गळतीमुळे गॅस सिलेंडरचा स्फोट झाला. मोठा आवाज झाल्याने शेजारील नागरिक जमले तर घटनेची माहिती मिळताच अग्निशमन दलाने धाव घेऊन मदतकार्य राबवले.
हेदेखील वाचा : Mumbai: मुंबईत गॅस सिलिंडरचा भीषण स्फोट! मालवणीतील चाळीला आग, 7 जण गंभीर जखमी
दरम्यान, या घटनेत यादव हे गंभीर जखमी झाले असून, घर आणि प्रापंचिक साहित्याचे मोठे नुकसान झाले आहे. यादव यांची प्रकृती गंभीर असल्याने इंदिरा गांधी सामान्य रुग्णालयात प्राथमिक उपचार करुन त्यांना पुढील उपचारासाठी सांगली सिव्हील रुग्णालयात पाठवले आहे.
मुंबईतही दुर्घटना
काही दिवसांपूर्वी, मुंबईतील मालवणी परिसरातून एक दुर्घटना समोर आली आहे. एका गॅस सिलिंडरचा स्फोट झाल्याने चाळीला आग लागल्याचे समोर आले आहे. या स्फोटात सात जण गंभीर जखमी झाले आहे. ही दुर्दैवी घटना मालवणी गेट क्रमांक ८ जवळ भारतमाता शाळेजवळील एसी मशिदीनजीकच्या चाळीत सकाळी घडली.