सासवड/संभाजी महामुनी : पुणे- पंढरपूर या राष्ट्रीय पालखी महामार्गावरील पुरंदर तालुक्यातील सासवड येथील एसटी बस आगार सर्वात सुरक्षित समजले जाते. पुणे शहरापासून सर्वात जवळचे असून सासवडच्या मध्यवर्ती असल्याने त्यास विशेष महत्व आहे. दिवसभरात शेकडो प्रवाशी, शालेय विद्यार्थ्यांची वर्दळ असते. परंतु रात्री १० नंतर येथे वाहतूक व्यवस्थापक व्यवस्थापक उपलब्ध नसतात. त्यामुळे रात्रीचा कारभार बऱ्यापैकी रामभरोसे असतो. परिणामी लांब पल्ल्याच्या सर्व बस स्थानकात न येत रस्त्यावरूनच पुढे जातात. बस स्थानकात फक्त चोरटे, खिसेकापू यांचीच वर्दळ असते.
दिनांक २५ फेब्रुवारी रोजी पुणे येथील स्वारगेट बस स्थानकात एका युवतीवर शिवशाही बसमध्ये अत्याचार केल्याची घटना उघडकीस आली. या घटनेने संपूर्ण राज्यात खळबळ उडाली असून, एसटी बसस्थानके महिलांसाठी सुरक्षित नसल्याचे समोर आले आहे. या घटनेनंतर परिवहन मंत्र्यांनी राज्यातील एसटी बस स्थानकाचा आढावा घेण्याचे आदेश दिले आहेत. या पार्श्वभूमीवर सासवड बस स्थानकातील परिस्थितीचा आढावा घेतला असता. येथे दररोज रात्रभर वाहतूक व्यवस्थापक उपलब्ध नसल्याचे डेपोमधील अधिकाऱ्यांनी सांगितले. परिणामी रात्री दहा नंतर प्रवाशांना रस्त्यावर उभे राहून एसटीची वाट पहावी लागते. काही बस थांबतात तर काही तशाच पुढे निघून जातात, असाही खुलासा केला आहे.
आणखी किमान २० एसटी बसची आवश्यकता
दरम्यान कोरोनापूर्वी ५७ एसटी बस होत्या, परंतु सध्या फक्त ३४ बस उपलब्ध असून बसेसची संख्या कमी असल्याने अनेक गावांच्या फेऱ्या कमी केल्याचे अधिकाऱ्यांनी सांगितले आहे. सध्या १०० चालक, ७३ वाहक, २४ इतर कर्मचारी, ६ सुरक्षा रक्षक, ३० तांत्रिकी, ३४ बसेस अशी सुविधा उपलब्ध आहे. तर आणखी किमान २० एसटी बसची आवश्यकता असल्याचे सहायक वाहतूक अधिकारी राजाराम गायकवाड यांनी सांगितले.
एक सुरक्षा रक्षक व कर्मचारी डेपोत तैनात
सहाय्यक वाहतूक अधिकारी राजाराम गायकवाड म्हणाले, बसस्थानक आवारात सर्वत्र सीसीटीव्ही कॅमेरे बसविण्यात आले आहेत. सहा सुरक्षा कर्मचारी वेगवेगळ्या वेळेमध्ये २४ तास कार्यरत आहेत. रात्री एक सुरक्षा रक्षक बस स्थानकात आणि एक कर्मचारी बस डेपोमध्ये तैनात असतात. तसेच महिला प्रवाशासाठी हिरकणी कक्ष २४ तास उपलब्ध असून, रात्रीच्या प्रवासात एखाद्या महिलेला बसची व्यवस्था नसल्यास हिरकणी कक्षात व्यवस्था करण्यात येते. रात्री पोलीस स्टेशनकडून गस्त घालण्यात येते. रात्रीच्या वेळी बस स्थानक आणि बस डेपोमध्ये प्रत्येकी एक-एक अधिकारी मुक्कामी असतात, असे गायकवाड यांनी सांगितले.
टवाळखोरांवर कारवाईसाठी बंदोबस्ताची मागणी
बसची संख्या कमी असल्याने तालुक्यातील बहुतेक मुक्कामी बस रद्द केल्या आहेत. परिणामी बाहेर गावावरून येणारे प्रवाशी, विद्यार्थी, कामगार यांची मोठी अडचण होत आहे. यवतच्या किमान तीन फेऱ्या वाढविण्याची गरज आहे. त्याचप्रमाणे कापूरहोळ ५ फेऱ्या, सासवड उरुळी, सासवड सुपा, जेजुरी उरुळी, सासवड गुरोळी, सासवड पोंढे या मार्गावर फेऱ्यांची संख्या वाढविणे आवश्यक आहे. त्यासाठी गाड्यांची संख्या वाढविण्याची मागणी बस स्थानकातील कर्मचाऱ्यांनी केली आहे. दिवसा एसटी स्थानकात प्रवाशांची मोठी वर्दळ असते. सणसमारंभ, यात्रा उत्सव, बाजार दिवस यावेळी प्रवाशांची गर्दी असल्याने चोऱ्या, पाकीटमारी करणारे सुसाट असतात. टवाळक्या करणारे दिवसा येवून मारामाऱ्या करण्याच्या घटना वारंवार घडतात. त्यामुळे दिवसा पोलिस बंदोबस्त देण्याची मागणी एसटी कर्मचाऱ्यांनी केली आहे.
सासवड बसस्थानक परिसरात पोलिसांच्या वतीने सतत गस्त सुरु असते. दिवसा आणि रात्रीही आमचे कर्मचारी पाहणी करीत असतात. रात्रीच्या वेळी दर तासाला पोलिस गस्त पथक जात असते. तर दिवसाही निर्भयापथक, डीबी पथक, राखीव पोलिस कर्मचारी केवळ एसटीबस स्थानकच नाही, तर सासवडमधील सर्व शाळा, कॉलेज, बाजारपेठ, रहिवाशांच्या सोसायट्या अशा गजबजलेल्या आणि निर्जन ठिकाणी सुद्धा पोलिस कर्मचारी भेट देवून लोकांच्या संपर्कात असतात. फोन केल्यावर पाच मिनिटांत पोलिस कर्मचारी तिथे पोहोचून कारवाई करतात.
– ऋषिकेश अधिकारी, पोलिस निरीक्षक, सासवड.