इस्लामपुरात मोटर गॅरेजला आग
इस्लामपूर : इस्लामपूर-कापूसखेड मार्गावरील दत्तकृपा मोटर गॅरेजला लागलेल्या आगीत दुचाकी, चारचाकी, गॅरेजमधील व घरातील साहित्य जळून खाक झाले. यामध्ये तब्बल 15 लाख रूपयांचे नुकसान झाले. ही घटना सोमवारी रात्री 12 ते एकच्या सुमारास घडली. या आगीचे नेमके कारण समजू शकले नाही.
याबाबत घटनास्थळावरून मिळालेली माहिती अशी, इस्लामपूर येथील योगेश विलास सुर्यवंशी यांच्या मालकीचे दत्तकृपा मोटर गॅरेज आहे. सोमवारी रात्री ते गॅरेज बंद करून शेजारीच असणाऱ्या घरी गेले. दरम्यान, रात्री बारा वाजण्याच्या सुमारास टायर फुटल्याचा आवाज झाल्याने योगेश जागे झाले. त्यांनी घरातून बाहेर येऊन पाहिले तर दुचाकीने पेट घेतला होता. त्यांनी पाणी टाकून आग विझवण्याचा प्रयत्न केला. मात्र, आग भडकत गेली.
दरम्यान, दुचाकीच्या शेजारी असलेल्या कारला आग लागली. बघता-बघता आगीने रौद्ररूप धारण केले. गॅरेजच्या अंगणात लावलेल्या अन्य मोटारींना ही आग लागली. भेदरलेल्या सुर्यवंशी यांनी आग विझवण्याचा प्रयत्न केला. पण आग भडकतच गेली.
पाच वाहन आगीत जळून खाक
मारुती सुझूकी कार (MH12T1024), बोलेरो गाडी (MH09BB5272), सफारी गाडी (MH12BV4608), मोटार सायकल (MH10AD6877), मोटार सायकल (MH50P4728), 407 टेम्पो (MH12GT9625) तसेच घरातील प्रापंचिक साहित्य कपडे, धान्य, भांडी, टीव्ही, फ्रीज, पीठाची गिरण, तसेच गॅरेजमधील एअर कॉप्रेसर इलेक्ट्रिक गन , स्पॅनर सेट, ऑईल जॉक, ग्रीअर गाडा, टूल बॉक्स, कीट्स स्पेअर पार्ट, अॅक्सेसरीज, तसेच गरेजचा व राहत्या घराचा लोखंडी पत्रा असे सर्व मिळून 15 लाख रुपयांचे आगीमध्ये नुकसान झाले. शेजारी असणाऱ्या त्यांच्या घराला ही आग लागली. आगीत गॅरेजमधील व घरातील संसारोपयोगी साहित्य जळून खाक झाले. या घटनेची नोंद इस्लामपूर पोलिस ठाण्यात झाली आहे.
अग्निशमन उशिरा दाखल…!
आग लागताच नागरिक जमा झाले. त्यांनी आग विझवण्याचा अटोकाट प्रयत्न केला. अग्निशमन विभागाला आगीची माहिती दिली. मात्र, आग लागून तासभर झाला तरी अग्निशमनचे बंब दाखल झाले नाहीत. अगदी हाकेच्या अंतरावर नगरपालिकेचे अग्निशमन दलाचे कार्यालय असताना आग विझवण्यासाठी अग्निशमन बंब उशिरा आल्याने त्यामुळे सुर्यवंशी यांची जादा नुकसान झाल्याची चर्चा घटनास्थळी होती.