पंचवटी : घंटागाडीचे चाक थेट डोक्यावरून गेल्याने एका तरुणीचा जागीच मृत्यू झाल्याची घटना मुंबई-आग्रा महामार्गावर घडली आहे. या घटनेमधील घंटागाडी चालकाला पंचवटी पोलिसांनी ताब्यात घेतले असून, पुढील तपास सुरु आहे.
विनिता रामचंद्र कुयटे (२७, रा. केशवलीला पार्क, भावबंधन मंगल कार्यालयाजवळ, हनुमानवाडी, पंचवटी) या आपली दुचाकीवरून कॉलेजला जात असताना अमृतधाम चौफुली येथे घंटागाडी (एमएच १५ एचएच ८४६४) च्या मागील चाकाखाली आल्याने चाक थेट तिच्या डोक्यावरून गेल्याने तिचा जागीच मृत्यू झाला. घटनेची माहिती मिळताच पंचवटी पोलीस ठाण्यातील कर्मचाऱ्यांनी धाव घेत मृतदेह शव विच्छेदनासाठी जिल्हा रुग्नालयात पाठवला असून, घंटागाडी चालक बाळू रंगनाथ जाधव (४५, रा. कॅनॉल रोड, आम्रपाली नगर, जेलरोड) याला ताब्यात घेतले असून, त्याच्याविरोधात पंचवटी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
मयत विनिता कुयटे हिने आपल्या डोक्यात हेल्मेट घातले होते. मात्र, घंटागाडीचे चाक थेट हेल्मेटवरून गेल्याने हेल्मेटसह चेहऱ्याचा देखील चेंदामेंदा झाला होता. त्यामुळे नागरिकांनी हेल्मेट घेताना उच्च प्रतीचे घेणे आवश्यक असल्याचा सूर उपस्थित नागरिकांमध्ये सुरु होता.