पुणे : एमपीएससी परीक्षा पास (MPSC Pass) होऊन राज्यात तिसरी आलेल्या 26 वर्षीय दर्शना पवार (Darshana Pawar) प्रकरणात महत्त्वाची माहिती समोर आली आहे. राजगडाच्या पायथ्याशी कुजलेल्या अवस्थेत तिचा मृतदेह सापडला. ती आणि तिचा एक मित्र ट्रेकिंगला गेले आणि त्यानंतर परतले नसल्याने त्यांच्या कुटुंबियांकडून तक्रार दाखल करण्यात आली होती. त्यानंतर अचानक राजगडाच्या पायथ्याची या तरुणीचा मृतदेह आढळल्याने खळबळ उडाली आहे. त्यामध्ये याप्रकरणी धक्कादायक माहिती समोर येत आहे.
दर्शना पवार आणि तिचा मित्र राहुल हांडोरे हे दोघे ट्रेकिंगला गेले होते. पण त्यानंतर राहुल हांडोरे हा अद्यापही फरार आहे. याच मित्राने हत्या केली, असा संशय पोलिसांनी व्यक्त केला. सीसीटीव्ही फुटेज पाहून हा संशय वर्तवण्यात येत होता. या प्रकरणाचा तपास करण्यासाठी पोलिसांनी पथक तयार केले आहेत. त्यानुसार, दर्शना आणि राहुल यांच्या घरच्यांची आणि त्यांच्या संपर्कात असलेल्या अनेकांची चौकशी करण्यात येणार आहे.
दर्शनाचा खूनच
एमपीएससी परीक्षेत राज्यातून तिसरा क्रमांक घेऊन उत्तीर्ण झालेल्या दर्शना पवार हिचा खून झाल्याचे डॉक्टरांच्या तपासणी अहवालातून समोर आले आहे. डोक्यात घाव घालून तिचा खून झाला असून, तिच्या अंगावर खूना देखील दिसून आल्या आहेत. दरम्यान, तिचा खून कोणी व का केला, हे मात्र अद्याप स्पष्ट झालेले नाही. पोलीस आता तिचा खून कोणी केला, याचा शोध घेऊ लागले आहेत.
पुण्यात आली होती सत्कार समारंभासाठी…
पुण्यातील एका संस्थेच्या सत्कार समारंभासाठी ती पुण्यात आली होती. ९ जून रोजी ती पुण्यात आली. सिंहगड रस्ता भागातील नऱ्हे परिसरात एका मैत्रिणीकडे ती राहत होती. १२ जून रोजी सिंहगड किल्ल्यावर निघाली आहे, असे मैत्रिणीला सांगून ती घराबाहेर पडली. दर्शनाने कुटुंबीयांना याबाबतची माहिती दिली होती. तिच्यासोबत राहुल दत्तात्रय हांडोरे होता.
सीसीटीव्हीत आढळलं भलतच
दर्शना व तिचा मित्र राहुल हांडोरे हे १२ जून रोजी दुचाकीवरुन वेल्हे तालुक्यातील राजगड किल्ला परिसरात गेले होते. सकाळी सव्वासहाला निघाले होते. आठच्या सुमारास दोघे गडाच्या पायथ्याशी पोहोचले. दोघानी गड चढायला सुरुवात केली. सकाळी दहाच्या सुमारस राहुल गडावरुन एकटाच पळत खाली आला. राजगड किल्ल्याच्या पायथ्याशी असलेल्या एका हॉटेलच्या परिसरातील सीसीटीव्हीत हा प्रकार कैद झाला. दरम्यान, मित्र राहुल बेपत्ता आहे. त्याचा युद्धपातळी शोध घेतला जात आहे. पण, अद्यापही तो मिळालेला नाही. दरम्यान, तो एकटाच खाली जाताना दिसल्याने त्याच्यावर संशयाची सुई गेली असून, त्यादृष्टीने पोलिसांकडून तपास सुरू केला आहे.