कोल्हापूरच्या शाहुवाडी तालुक्यात गव्याचा तरुणावर हल्ला; तरुण गंभीर जखमी
काही वेळानंतर याच रस्त्याने जाणाऱ्या एकास रस्त्याच्या कडेला कोणीतरी जखमी झाल्याचे व विव्हळत पडले असल्याचे चित्र दिसले. त्याने तातडीने ओळखीच्या लोकांना संपर्क साधल्यामुळे काही वेळातच लोक तिथे जमा झाले.
शाहुवाडी : शाहुवाडी तालुक्याच्या उत्तर भागातील शित्तूर-वारूण येथील बाद्याचा ओढ्यानजीक बुधवारी (दि.८) रात्री साडे नऊच्या दरम्यान कामावरून घरी परतणाऱ्या शिराळे-वारूण येथील मयूर दगडु यादव (वय २५) या तरुणावर गव्याने जोरदार हल्ला केला. यामध्ये तो गंभीररीत्या जखमी झाला असून, त्याला तातडीने कृष्णा हॉस्पिटल, कराड येथे उपचारासाठी दाखल करण्यात आले.
याबाबत अधिक माहिती अशी, मयूर यादव हा आरळा (ता.शिराळा) येथील बाजारपेठेमध्ये केशकर्तनालयाचे काम करतो. तो आपले काम आटोपून घरी परतत असताना शित्तूर-वारूण येथील बाद्याचा ओढ्यानजीक लघुशंकेसाठी उभा राहिला. नेमक्या त्याच वेळेस पाठीमागून आलेल्या गव्याने मयूरला जोराची धडक दिली. यामध्ये मयूरच्या डोक्यास व इतर ठिकाणी गंभीर दुखापत झाल्याने मयूर जागेवरच बेशुद्ध पडला.
काही वेळानंतर याच रस्त्याने जाणाऱ्या एकास रस्त्याच्या कडेला कोणीतरी जखमी झाल्याचे व विव्हळत पडले असल्याचे चित्र दिसले. त्याने तातडीने ओळखीच्या लोकांना संपर्क साधल्यामुळे काही वेळातच लोक तिथे जमा झाले. त्यांनतर तातडीने जखमी मयूर यास उपचारासाठी कृष्णा हॉस्पिटल, कराड येथे हलविण्यात आले. घटनास्थळी वन विभागाच्या कर्मचाऱ्यांनी भेट देऊन पंचनामा केला.
दरम्यान, या परिसरामध्ये वन्य प्राण्यांच्या हल्ल्याचे प्रमाण हे कमालीचे वाढले आहे. याआधी वन्य प्राण्यांच्या हल्ल्यात आतापर्यंत तीन जण ठार तर अनेकजण जखमी झालेले आहेत. अशा घटना वारंवार घडत आहेत. मात्र, तरीही वन विभागाकडून कोणत्याही ठोस उपाययोजना केल्या जात नाहीत. वन विभागाने या वन्य प्राण्यांचा तातडीने बंदोबस्त करावा, अशी मागणी नागरिकांमधून सातत्याने होत आहे.
तळोदा तालुक्यात वृद्ध महिलेवर हल्ला
सातपुडा पर्वत रांगेत असलेल्या तळोदा तालुक्यातील खुर्चीमाड या गावात एकाने 80 वर्षीय वृध्द आदिवासी महिलेवर वे बिबट्याने हल्ला केला. वृद्ध महिलेला बिबट्याने काही अंतरापर्यंत फरफटत नेले होते. यात वृद्धेचा मृत्यू झाल्याची घटना घडली. सदरची घटना गुरुवारी सकाळच्या सुमारास घडली असून, या घटनेमुळे गावात भीतीचे वातावरण पसरले आहे. तळोदा तालुक्यात बिबट्याच्या हल्ल्यात आत्तापर्यंत 7 जणांचा मृत्यू तर 33 जण गंभीररित्या जखमी झाले आहेत.