
ए बी फॉर्म हॉटेलमध्ये की कार्यालयात देणार? उमेदवारांसह पक्षप्रमुखांची लागणार कसोटी
महापालिकेच्या एका निवडणुकीत काँग्रेस पक्षाच्या उमेदवारांना हॉटेलमध्ये बोलावून एबी फॉर्म देण्यात आले होते. पंचतारांकित हॉटेलमधून कलमाडी पक्ष चालवत आहेत, अशी टीका करण्यात आली होती. परंतु हा सोयीचा मार्ग भाजप सुद्धा यंदा निवडेल असे दिसते. प्रत्येक जागेसाठी किमान दहा इच्छुक आहेतच. गेल्या वर्षभरात या सर्वांनी खर्च बराच केलेला आहे. स्थानिक राजकारणात काहींनी उमेदवारी मिळणे हा प्रतिष्ठेचा मुद्दा केला आहे. असे इच्छुक उमेदवारीसाठी आणि उमेदवारी पक्षाकडून न मिळाल्यास टोकाला जाणारे असतात. या सर्वांना तोंड देण्यासाठी रीतसर यादी जाहीर होणार नाहीत.
भाजपमध्ये यादी निश्चित झाली आहे. शिंदे यांच्या शिवसेनेला किती आणि कोणत्या जागा द्यावयाचे हे सुद्धा ठरले आहे. संभाव्य बंडखोरी टाळण्यासाठी नावांची घोषणा उशिराने केली जाणार आहे. तरीही काही पक्क्या उमेदवारांना कामाला लागा, असे संदेश अधिकृतपणे पाठविण्यात आले आहेत. आणि असे निरोप मिळालेले उमेदवार यांच्या गोटात प्रचाराची लगबग चालू झालेली आहे. हे केवळ भाजपमध्ये घडते आहे असे नाही अन्य पक्षातही निरोपानिरोपी सुरू झाली आहे. अदलाबदलीसाठी पाच दहा टक्के जागा राखीव ठेवल्या आहेत. एखादा तगडा उमेदवार मिळाला तर त्याची वर्णी लावण्याची सोय केलेली आहे. शिंदे यांच्या पक्षाचे एक उत्साही उमेदवार शनिवारी अर्ज दाखल करणार होते, त्यांना थांबा असा निरोप देऊन थांबविण्यात आले आहे. शिंदे यांच्या शिवसेनेचे प्रमुख रवींद्र धांगेकर यांचा मुलगा काही थांबायला तयार नाही, तो उमेदवारीच्या पावित्र्यात आहे आणि मी त्याला थांबवू शकत नाही असे धांगेकर म्हणत आहेत. पक्ष प्रमुखाच्या घरातही तणावाची स्थिती आहे तर अन्यत्र काय असेल याची कल्पना केलेली बरी.