सातारा : माढा लोकसभा मतदारसंघातील राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार यांच्या पक्षाचे अभयसिंह जगताप यांचे बंड शमविण्यात पक्षाला यश आले आहे. प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी त्यांची समजूत काढल्यामुळे त्यांनी निवडणुकीच्या रिंगणातून बाजूला होण्याचा निर्णय घेतला आहे. त्यांनी महाविकास आघाडीचे उमेदवार धैर्यशील मोहिते पाटील यांच्यासोबत राहण्याचा निर्णय घेतला आहे. त्यामुळे माढ्यात महायुतीचे उमेदवार रणजितसिंह नाईक निंबाळकर यांच्यापुढील अडचणी वाढल्या आहेत.
माढा लोकसभा मतदारसंघात महाविकास आघाडीत राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षाचे नेते अभयसिंह जगताप यांनी उमेदवारी भरण्याचा निर्णय घेतला होता. मात्र, खासदार शरद पवार व प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी त्यांची समजूत काढली. तसेच त्यांना भविष्यात संधी दिली जाईल, असाही शब्द अभय जगताप यांना दिला आहे.
त्यामुळे धैर्यशील मोहिते पाटील यांची उमेदवारी जाहीर होताच बंडाचा पवित्रा घेतलेले अभयसिंह जगताप यांचे बंड थोपविण्यात शरद पवार व जयंत पाटील यांना यश आले आहे. त्यामुळे धैर्यशील मोहिते पाटील यांच्या ताकदीत वाढ झाली असून, महायुतीचे उमेदवार रणजितसिंह मोहिते पाटील यांच्या अडचणीत वाढ झाली आहे.
मोहिते-पाटील यांच्या पाठिशी
यासंदर्भात अभय जगताप म्हणाले, राष्ट्रवादीत दुफळी निर्माण झाल्यानंतर अनेकांनी त्यांची साथ सोडली आहे. पण अशा वाईट परिस्थितीत खासदार शरद पवार यांना एकटे सोडणार नाही. त्यांच्याबद्दल असणारी निष्ठा आम्ही कायम ठेवणार आहोत. त्यांच्या सूचनेनुसार आम्ही महाविकास आघाडीचे उमेदवार धैर्यशील मोहिते पाटील यांच्या पाठीशी आमची ताकद लावणार आहोत.
[blockquote content=”जातीयवादी भाजपला रोखण्यासाठी आम्ही सदैव शरद पवार यांच्यासोबत राहणार आहोत. जयंत पाटील यांनी माढा लोकसभेचा सर्व्हे केला होता. यामध्ये मोहिते पाटील यांचे नाव आघाडीवर होते. त्यामुळे त्यांनी माझी समजूत काढली असून, मला आणखी काम करण्याची गरज आहे.” pic=”” name=”-अभयसिंह जगताप, राष्ट्रवादीचे नेते”]