पंचवटी : मामा आणि आईसोबत दुचाकीवरून नातेवाइकांना भेटून माघारी मामाच्या गावी येत असताना दुचाकीचा अपघात (Accident in Nashik) झाला. या अपघातात दुचाकीवर आईच्या कुशीत बसलेली अवघ्या दहा महिन्यांची ज्ञानेश्वरी उर्फ हिंदवी अमोल वारुंगसे (रा. सोनारी, ता. सिन्नर) या बालिकेच्या डोक्याला गंभीर मार लागला. त्यानंतर तिला तातडीने रुग्णालयात दाखल करण्यात आले. मात्र, उपचारापूर्वीच दुर्दैवी मृत्यू झाला.
चांदगिरी-शिंदे रस्त्यावरील जाखोरी फाट्यावरील शंकराच्या मंदिराजवळ हा अपघात झाला. या अपघातातील मृत बालिका ज्ञानेश्वरी ही आई गायत्रीसोबत सोनारी येथून शिंदे गावातील मामाकडे आली होती. शुक्रवारी मामा शुभम बेरड यांच्यासोबत आई गायत्री आणि ज्ञानेश्वरी असे तिघेजण दुचाकीने चांदगिरी येथे नातेवाईकांना भेटण्यासाठी गेले होते. त्यावेळी ही घटना घडली.
अचानक ब्रेक दाबला अन्…
चांदगिरी येथे नातेवाईकांना भेटून दुचाकीने माघारी येत असताना समोरून दुचाकी आडवी आली. शुभम बेरड यांनी आपल्या दुचाकीचे ब्रेक अचानक दाबल्याने त्यांची दुचाकी घसरून रस्त्यावर पडली. या अपघातात दुचाकीच्या मागे बसलेल्या गायत्री वारुंगसे यांच्या कुशीतील बालिका ज्ञानेश्वरी ही रस्त्यावर पडल्याने तिच्या डोक्याला मार लागून गंभीर दुखापत झाली तर आई गायत्री आणि मामा शुभम हे किरकोळ जखमी झाले.
या अपघातानंतर गंभीर जखमी ज्ञानेश्वरीस तत्काळ नाशिकरोड येथील बिटको रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले. डॉ. आंबोरे यांनी तिला तपासून मयत घोषित केले.