पुणे – शहरातील विविध चौक तसेच सिग्नलवर आणि इतर ठिकाणांवर एकत्र जमून रस्त्यावर जबदस्तीने पैसे मागणार्या तृथीयपंथीय तसेच भिक्षेकर्यांबाबत पुणे पोलिसांनी मोठा निर्णय घेतला आहे. जबरदस्तीने पैसे मागणाऱ्या व अश्लील वर्तन करणाऱ्या तृतीयपंथी यांच्यावर कारवाईचा बडगा उचलला जाणार आहे. तर, वेळेप्रसंगी गुन्हा देखील करण्यात येणार असल्याचे पुण्याचे पोलीस आयुक्त अमितेश कुमार यांनी यांनी पत्रकार परिषदेत सांगितले आहे.
पोलीस आयुक्त अमितेश कुमार म्हणाले, “तृतीयपंथी लोक व भिक्षेकरी लग्न कार्य, विविध उत्सव व कार्यक्रम ठिकाणी जातात तसेच सिग्नल, गर्दीचे ठिकाण व मुख्य चौकात पैसे गोळा करतात. काही वेळा त्यांच्याकडून जबरदस्तीने देखील पैसे गोळा केले जातात. दरम्यान याचा त्रास सर्व सामान्य नागरिकांना होत असून, घरोघरी, दुकानांवर जाऊन जबरदस्तीने पैसे मागत आहेत. गाडीच्या काचा वाजवून पैसे मागितले जातात अशा तक्रारी आमच्याकडे आलेल्या होत्या. यापार्श्वभूमीवर पोलीस आयुक्तांनी अशा पध्दतीने तृतीयपंथी, भिक्षेकरी पैसे मागत असतील तर त्यांच्याविरोधात खंडणी, बेकादेशीर जमाव, नागरिकांना त्रास होईल असे वर्तन करणे अशा विविध कायद्यान्वये गुन्हा दाखल करण्यात येणार” असल्याचे यावेळी आयुक्त म्हणाले.
शहरातील प्रमुख चौक, खासगी कार्यक्रमात शिरून पैसे मागितल्याच्या तक्रारी आल्यास कायदेशीर कारवाई करण्यात येणार आहे. याबाबतचा आदेश शुक्रवारपासून (दि.१२ एप्रिल) लागू करण्यात येणार आहे. याबाबत शहरातील सर्व पोलीस ठाण्यांतील वरिष्ठ निरीक्षकांना सूचना देण्यात आल्या आहेत, असे त्यांनी सांगितले.