पुणे: मोकळ्या मैदानात अथवा भव्य दिव्य मंगल कार्यालयात राजमहालाचे सेटअप उभारणे, ऑर्केट्रा, शाही जेवण, महागडे रूखवत, अलिशान गाड्या, पन्नास शंभर तोळे सोने, आलेल्या व्हीआयपींना भेटवस्तू आदी बाबींवर कोटीच्या कोटी उड्डाणे घेणाऱ्या मराठा समाजाला कुठेतरी आवरण्यासाठी आता सकल मराठा समाजाने आता ठोस पाऊल उचलले आहे. वैष्णवी हगवणेच्या हुंडाबळीनंतर मराठा समाजाने तातडीची बैठक घेऊन असले प्रकार थांबविण्यासाठी, येत्या पंधरा दिवसात मराठा समाजातील लग्न सोहळ्यासाठी व नेते मंडळींच्या उपस्थितीबाबत आचारसंहिता ठरविण्याचा ठराव केला आहे.
हगवणे प्रकरणाचे मराठा समाजात तीव्र पडसाद दिसून येत असून, ‘यापुढे ज्या घरात वैष्णवी हगवणे सारखा प्रकार घडेल, त्या घरात कोणीही मुलगी देऊ नये आणि त्या घरातील मुलगी कोणी करू नये असा निर्णय पुणे विभागाच्या बैठकीत घेण्यात आला आहे. बैठकीला श्रीकांत शिरोळे, चेतन तुपे, राजेंद्र कोंढरे, प्रशांत जगताप, प्रकाश म्हस्के, अरविंद शिंदे, दत्ता बहिरट, दत्ता धनकवडे, सुनील टिंगरे, पृथ्वीराज सुतार, विकास पासलकर, प्राची दुधाणे, कमल व्यवहारे, राजलक्ष्मी भोसले, सचिन तावरे, श्याम मानकर तसेच आदी उपस्थित होते.
या पुढे ज्या घरात वैष्णवी हगवणे सारखे प्रकार होतील, त्या घरात कोणीही मुलगी देऊ नये तसेच त्या घरातील मुलगी कोणी करू नये. असा ठराव यावेळी करण्यात आला. तसेच येत्या पंधरा दिवसांत संपूर्ण समाजाची बैठक बोलावून आचारसंहिता ठरविण्याचा निर्णय घेण्यात आला. यावेळी बोलताना प्रशांत जगताप म्हणाले, येथून पुढे कुठल्याही लग्नात आपण गेलो तर आपल्या हस्ते जावई सत्कार, नवरदेवाला गाडीची चावी देणे, भाषणबाजी करणे टाळले पाहिजे. केवळ लग्नच नव्हे अन्य समारंभातही असे प्रकार आपण टाळणे जरूरी असल्याचे त्यांनी सांगितले.
मराठा समाज हगवणे यांनी केलेल्या कृत्याला पाठिंबा देणार नाही किंवा त्यांचे समर्थन करणार नाही, पण मराठा समाजाने परीक्षण करण्याची गरज आहे. या प्रकरणामुळे समाजाची बदनामी होते असल्याचे यावेळी उपस्थितांनी सांगितले. लग्नाबाबत आचार संहिता करणे गरजेचे आहे. मुलींना शिकवा, त्यांना स्वतःच्या पायावर उभे करा. दुसऱ्याने मोठे लग्न केले म्हणून आपणपण केले पाहिजे हा हट्ट नको, लग्नामधील भाषणबाजी बंद करा, कमी वेळेत, कमी लोकांमध्ये आणि कमी खर्चात लग्न करावे. जमीन विकून मुलीचे लग्न करू नका. मराठा समाजातील एका वर्गाला समज नसून माज आला आहे. हे आज मान्य करायला हवे. हगवणे कुटुंबीयांनी केलेले कृत्य हे समाजाला काळिमा फासणारे आहे. आचारसंहितेची अंमलबजावणी आपण आपल्या कुटुंबापासून सुरूवात करू अशी मते उपस्थितांनी व्यक्त केली.
लग्नावर करण्यात येणारा अफाट खर्च, नेत्यांसाठी लग्न थांबविण्याचे प्रकार, मुहूर्तावर लग्न न लावणे, रुखवतात देण्यात येणाऱ्या महागड्या वस्तू, लग्नात होणारी भाषणबाजी आदी विषयांवर या बैठकीत सविस्तर चर्चा झाली. हे सर्व प्रकार रोखण्यासाठी आचारसंहिता असावी, यासाठी समाज म्हणून एकत्र यावे लागेल, अशी अपेक्षा सर्वच उपस्थितांनी या वेळी व्यक्त करीत वरील ठराव एकमताने मान्य करण्यात आला.