After Mahayuti cabinet portfolio allocation leaders trying for district Guardian Minister post
मुंबई : राज्यामध्ये महायुती सरकारकडून प्रशासन व व्यवस्थेची तयारी सुरु आहे. राज्याचे मंत्रिमंडळ जाहीर झाल्यानंतर आता आठवड्याभरामध्ये खातेवाटप जाहीर करण्यात आलेले आहे. मंत्रिमंडळ विस्तारामध्ये काही नेते नाराज झाले होते. त्यानंतर आता खातेवाटपानंतर देखील नेत्यांच्या प्रतिक्रिया समोर येत आहे. राज्य सरकारचे खातेवाटप जाहीर झाल्यानंतर आता पालकमंत्री पदावरुन नेत्यांमध्ये रस्सीखेच सुरु झाली असल्याचे दिसून आले आहे.
15 डिसेंबर रोजी राज्य सरकारचा मंत्रिमंडळ विस्तार करण्यात आला. यामध्ये अनेक नेत्यांना संधी देण्यात आली. तर काही नेत्यांचा पत्ता कट करण्यात आला. यामुळे काही नेत्यांनी उघडपणे आपली नाराजी जाहीर केली होती. मंत्रिमंडळ विस्तारानंतर लगेचच राज्याचे हिवाळी अधिवेशन सुरु झाले. या हिवाळी अधिवेशनापूर्वी किंवा त्यादरम्यान खातेवाटप होईल, अशी शक्यता वर्तवली जात होती. मात्र अखेर अधिवेशन संपल्यानंतर रात्री उशीरा खातेवाटप जाहीर करण्यात आले. आता मंत्र्यांमध्ये पालकमंत्री पदावरुन रस्सीखेच सुरु झाली आहे.
नागपूर हिवाळी अधिवेशनासंबंधित बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा
महायुतीमध्ये खातेवाटपानंतर पालकमंत्रिपदावर नेत्यांनी दावा करण्यात सुरुवात केली आहे. रायगड जिल्ह्याच्या पालकमंत्रिपदावर मंत्री भरत गोगावले यांनी दावा केला आहे. त्यासोबतच अदिती तटकरे या देखील रायगडच्या पालकमंत्रिपदासाठी इच्छुक आहेत. त्यामुळे पालकमंत्री कोणाला मिळणार याची उत्सुकता लागली आहे. तर महायुतीच्या मंत्रिमंडळामध्ये मुंडे बंधु भगिनी आहेत. त्यामुळे बीड जिल्ह्याच्या पालकमंत्री पदाची धुरा धनंजय मुंडे की पंकजा मुंडे यांच्याकडे येणार यातकडे सर्वांचेच लक्ष लागले आहे. तसेच संभाजीनगरमध्ये संजय शिरसाट की अतुल सावे यापैकी कोणाच्या गळ्यात पालकमंत्रिपदाची माळ पडणार हे पाहणं महत्त्वाचे ठरणार आहे.
महायुतीमध्ये गृहखात्यावरुन देखील रस्सीखेच सुरु झाली होती. एकनाथ शिंदे यांनी मुख्यमंत्रिपदावरील दावा सोडल्यानंतर गृहखात्याची मागणी केली होती. मात्र भाजपने हे मान्य केले नाही. त्यामुळे एकनाथ शिंदे यांचे नाराजीनाट्य देखील सुरु झाले होते. खातेवाटप जाहीर झाल्यानंतर आता गृहखाते हे भाजपकडे असल्याचे स्पष्ट झाले आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे गृहखात्याचा कारभार देण्यात आलेला आहे. तर उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याकडे नगर विकास खाते देण्यात आले आहे. उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्याकडे पुन्हा एकदा राज्याच्या तिजोरीची चावी देण्यात आली आहे. अर्थखाते हे महायुतीच्या नवीन सरकारमध्ये देखील अजित पवार यांच्याकडे असणार आहे.
राजकीय घडामोडी वाचण्यासाठी येथे क्लिक करा
त्याचबरोबर भाजप नेते चंद्रशेखर बावनकुळे यांच्याकडे महसूल, चंद्रकांत पाटील यांच्याकडे उच्च आणि तंत्रशिक्षण व संसदीय कामकाज देण्यात आले आहे. गिरीश महाजन यांच्याकडे लसंपदा (विदर्भ, तापी, कोकण विकास महामंडळ) तर नितेश राणे यांच्याकडे मत्स्यव्यवसाय व बंदरे विभाग देण्यात आला आहे. त्याचबरोबर मुंडे भावंडांकडे देखील महत्त्वाची खाती देण्यात आली आहे. धनंजय मुंडे यांच्याकडे अन्न, नागरी पुरवठा आणि ग्राहक संरक्षण हे खाते तर पंकजा मुंडे यांना र्यावरण आणि हवामान बदल, पशुसंवर्धन ही खाती देण्यात आली आहे. त्यामुळे देवेंद्र फडणवीस यांच्या मंत्रिमंडळांमध्ये भाजप नेत्यांना महत्त्वाची जबाबदारी देण्यात आली आहे.