मुंबई : मुंबई महापालिकेत (BMC) शिंदे गट आणि ठाकरे गट यांच्यात बुधवारी महापालिकेतील पक्ष कार्यालयावर ताबा मिळवण्यासाठी जोरदार राडा झाला होता. अनेक दिवस बंद असलेल्या या कार्यालयावर शिंदे गटानं ताबा मिळवल्यानंतर ठाकरे गट तिथं पोहचला आणि महापालिकेत जोरदार घोषणाबाजी झाली होती. तसंच हाणामारी झाल्याचीही माहिती आहे. आता या राड्यानंतर हे कार्यालय सील करण्याचा महत्वाचा निर्णय मुंबई महापालिकेचे आयुक्त इक्बालसिंह चहल (Iqbal Singh Chahal) यांनी घेतला आहे. सगळ्याच पक्षांची कार्यालये सील करण्यात आल्याची माहिती आहे. तर, बुधवारच्या राड्यानंतर ठाकरे गट आक्रमक झाला असून ठाकरे गटाच्या माजी नगरसेवकांनी गुरुवारी महापालिकेत येऊन जोरदार घोषणाबाजी केली. शिंदे गटाकडून यावेळी खासदार राहुल शेवाळे (Rahul Shewale), शीतल म्हात्रे आणि नरेश मस्के हे उपस्थित होते.
कोणत्या कायद्याने कार्यालये सील? नोटीस दिली का?- संजय राऊत
मुंबई महापालिकेत शिवसेनेचं (Shivsena) बहुमत आहे. सगळ्या पक्ष कार्यालयांना कोणत्या कायद्यानं सील लावण्यात आलं, असा प्रश्न संजय राऊत (Sanjay Raut) यांनी उपस्थित केलाय. शिवसेनेच्या कार्यालयात घुसखोर घुसतात, त्यानंतर पालिका प्रशासन टाळं लावतं, हे सगळं कुणाच्या आदेशानं चाललंय, असा प्रश्न राऊतांनी उपस्थित केला आहे. ठोकशाहीच्या बाबत ठाकरे गटाशी स्पर्धा करु नका असा इशाराही राऊत यांनी दिलाय.
जे जे बाळासाहेबांचे ते ते शिंदेंचे- नितेश राणे
मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यासोबत राज्यातले बहुतांश शिवसैनिक असल्यानं जे जे बाळासाहेब ठाकरे यांचे आहे ते ते एकनाथ शिंदेंचे आहे, असं वक्तव्य भाजप आमदार नितेश राणे यांनी केलंय. ठाकरे गट आता वाटीभरच शिल्लक राहिला असल्यानं त्यांनी हट्ट सोडावा, असा टोलाही राणेंनी लगावला आहे.
आता शिवसेना भवनावरही दावा
मुंबई महापालिका निवडणुकांपूर्वी हा वाद आणखी चिघळण्याची शक्यता आहे. आता मुंबई महापालिकेतील कार्यालयापाठोपाठ शिवसेना भवनावरही शिंदे गट दावा करण्याची शक्यता वर्तवण्यात येते आहे. असे झाल्यास मोठा संघर्ष उफाळू शकतो.