मोठी बातमी! सिन्नरच्या हायटेक बस स्थानकाचं छत कोसळलं, कृषी मंत्र्यांच्या हस्ते झालं होतं उद्घाटन
महाराष्ट्रात आज सकाळी मान्सूनचं आगमन झालं असून राज्यातील काही जिल्ह्यांमध्ये मुसळधार पाऊस सुरू आहे. हवामान विभागानेही अलर्ट जारी केला आहे. बऱ्याच ठिकाणी नुकसान झालं आहे. सिन्नर तालुक्यालाही पावसाने थैमान घातलं असून पावसाने सिन्नरच्या बस स्थानकाचं छत कोसळलं. कृषी मंत्री आणि स्थानिक आमदार माणिकराव कोकाटे यांच्या आमदार निधीतून हे बस स्थानक उभारण्यात आलं होतं.
समोर उभे असलेल्या शिवशाही बसवर छत कोसळलं आहे. बस स्थानकात प्रवासी होते, मात्र सुदैवाने या घटनेत कोणतीही जीवितहानी झाली नाही. प्रशासनाने धोका लक्षात घेऊन तात्काळ संपूर्ण बस स्थानक रिकामी केलं. सर्व प्रवाशांना बाहेर काढलं. या घटनेनंतर सिन्नर शहरातील वाहतूक काही काळासाठी पूर्णतः ठप्प झाली होती. त्यामुळे नागरिकांमध्ये प्रचंड संतापाचं वातावरण आहे.
Pune News : अरुंद बोळामध्ये जाऊन अडकली गाई; दहा तासानंतर गरोदर गो-मातेची सुखरुप सुटका
विशेष म्हणजे काही वर्षांपूर्वीच या बस स्थानकाचं माणिकराव कोकाटे यांच्या हस्ते मोठ्या थाटामाटात उद्घाटन झालं होतं. त्यामुळे बांधकामाचा दर्जा आणि प्रशासनाच्या भूमिकेवर अनेक प्रश्न निर्माण होत आहेत. बसस्थानकाच्या देखभाल दुरूस्तीचं काम देखील मंत्री कोकाटे यांच्या भावाच्या कंपनीकडे असल्याची माहिती सूत्रांकडून मिळाली आहे. दरम्यान या घटनेनंतर कृषी मंत्री माणिकराव कोकाटे काय भूमिका घेतात, याकडे संपूर्ण राज्याचं लक्ष लागलं आहे.