अहिल्यानगर : अहिल्यानगर महानगरपालिकेच्या निवडणुकीसाठी प्रारूप प्रभाग रचनेवर प्राप्त हरकतींपैकी एक हरकत अंशतः मान्य करण्यात आली आहे. त्यानुसार प्रभाग ९, १५ व १६ या तीन प्रभागात काही बदल करण्यात आले आहेत. सदर प्रारूप आराखड्यातील बदलानुसार नगरविकास विभागाकडून अंतिम प्रभाग रचना राज्य निवडणूक आयोगाकडे सादर करण्यात आली होती. त्याला आयोगाकडून मान्यता देण्यात आली आहे. त्यानुसार अंतिम प्रभाग रचना प्रसिद्ध करण्यात आल्याची माहिती आयुक्त तथा प्रशासक यशवंत डांगे यांनी दिली. सदर अंतिम प्रभाग रचनेचे नकाशे, व्याप्ती महानगरपालिकेच्या अधिकृत संकेतस्थळावर उपलब्ध करण्यात येत असल्याचेही आयुक्त तथा प्रशासक यशवंत डांगे यांनी सांगितले.
नगर विकास विभागाने जाहीर केलेल्या वेळापत्रकानुसार प्रभाग रचना तयार करून प्रारूप आराखडा प्रसिद्ध करण्यात आला. त्यावर आलेल्या ४३ हरकतींपैकी एक हरकत अंशतः मान्य करण्यात आली आहे. त्यानुसार प्रभाग १५ मधून प्रशांत सोसायटी परिसर व इतर भागाचे दोन ब्लॉक प्रभाग ९ मध्ये समाविष्ट करण्यात आले आहेत. त्यामुळे प्रभाग क्रमांक ९ ची लोकसंख्या २२ हजार ०९१ झाली आहे. प्रभाग १५ मधून दोन ब्लॉक कमी झाल्याने सरासरी लोकसंख्या कायम ठेवण्यासाठी अतिरिक्त लोकसंख्या प्रभाग क्रमांक १६ मधील शंकर महाराज मठ परिसर व अरुणोदय मंगल कार्यालय परिसर असे दोन ब्लॉक प्रभाग क्रमांक १५ मध्ये समाविष्ट करण्यात आले आहेत. त्यामुळे प्रभाग क्रमांक १५ ची लोकसंख्या १८ हजार ३०४ व प्रभाग क्रमांक १६ ची लोकसंख्या २१ हजार ०६१ अशी झाली आहे.
राज्य शासनाच्या वेळापत्रकानुसार १३ ऑक्टोबर पर्यंत अंतिम प्रभाग रचना प्रसिद्ध करण्याची मुदत होती. मात्र, नगर विकास विभागानेच हे वेळापत्रक जाहीर केले होते व त्यांच्याकडून अंतिम प्रभाग रचना २० ऑक्टोबर रोजी राज्य निवडणूक आयोगाकडे सादर करण्यात आली. राज्य निवडणूक आयोगानेही या अंतिम प्रभाग रचनेच्या प्रस्तावाला मान्यता दिली आहे. त्यानुसार अंतिम प्रभाग रचना महानगरपालिकेकडून प्रसिद्ध करण्यात आली आहे. महानगरपालिकेच्या संकेतस्थळावर अंतिम नकाशे, व्याप्ती नागरिकांच्या माहितीसाठी उपलब्ध करून देण्यात येत असल्याचे आयुक्त तथा प्रशासक यशवंत डांगे यांनी सांगितले.