
ऑक्टोबरमध्येच पाण्यासाठी टाहो! पाथर्डीत हजारो फळझाडांचे भवितव्य टांगणीला
‘नवराष्ट्र’ने दोन किलोमीटर पायी चालत या भीषण वास्तव परिस्थितीचा थेट ‘ग्राऊंड रिपोर्ट’ केला आहे. पाथर्डी तालुक्यातील पिरेवाडी येथे ६५ एकरांच्या विस्तीर्ण शेतामध्ये हजारो फळझाडांची हिरवीगार बाग उभी आहे. मात्र, यंदा पावसाने पूर्णपणे पाठ फिरवल्याने परिसरातील विहिरी पूर्ण कोरड्या पडल्या आहेत आणि बोअरवेलनेही पाणी देणे सोडले आहे.
एकूण फळबाग: ६५ एकर
फळझाडांची संख्या: ४,५०० आंब्याची, १,२०० सीताफळाची आणि ३५० नारळाची झाडे
शेततळ्याची क्षमता: ३ कोटी लिटर (३० दशलक्ष लिटर)
सध्याचा साठा: अवघा १५ ते २० दिवस पुरेल इतकाच!
ऑक्टोबर ते मे असा पुढील तब्बल सात-आठ महिन्यांचा मोठा काळ समोर असताना, एवढ्या मोठ्या बागेला पाणी कुठून आणायचे? हा प्रश्न शेतकऱ्यांसमोर उभा ठाकला आहे.
वर्षानुवर्षे पोटच्या लेकरासारखी जपलेली झाडे पाण्याअभावी डोळ्यांसमोर सुकू लागली आहेत. जर पुढील काही दिवसांत पाण्याची व्यवस्था झाली नाही, तर गेल्या १४ वर्षांपासून उभी केलेली ही बहुमोल फळबाग कायमची नष्ट होईल आणि हजारो झाडांवर कुऱ्हाड चालवण्याची वेळ येईल त्यामुळे शासनाने “आम्हाला सरकारकडून कोणताही पैसा नकोय, फक्त आमची ही १४ वर्षांची झाडं जगतील एवढं पाणी द्या!”— संतोष गर्जे (बाधित शेतकरी, पिरेवाडी) यांनी केवळ मागणी केली.
दुष्काळाची भीषणता दिवसेंदिवस वाढू लागली असून, पिरेवाडीतील या फळबागा वाचवण्यासाठी टँकरद्वारे किंवा विशेष योजनेतून तातडीने पाणी पुरवठा करण्याची आर्त हाक शेतकऱ्यांकडून दिली जात आहे. जर वेळेत मदत मिळाली नाही, तर पाथर्डीत कृषी क्षेत्राचे न भरून येणारे मोठे नुकसान होणार आहे.