
फोटो सौजन्य: iStock
शेतीचा नवा हंगाम जवळ येत असताना शेतकरी आर्थिक संकटात सापडले होते, तर प्रशासनाकडून उघडपणे चाललेला वेळकाढूपणा संतापजनक ठरत होता. या पार्श्वभूमीवर ‘जीवन ज्योत फाऊंडेशन’ पुढे सरसावले. संघटनेने वंचित शेतकऱ्यांची अचूक संख्या, पंचनाम्यांतील तपशील आणि नुकसानभरपाई प्रक्रियेतील विलंब याचे ठोस पुरावे गोळा करून तहसीलदार व पोलिस प्रशासनाला निवेदन सादर केले.
Ahilyanagar News: महायुतीत बेबनाव तर माविआ काही ठिकाणी भक्कम, सर्वच निवडणुक कार्यालयांमध्ये ‘जत्रा’
फाऊंडेशनने सादर केलेल्या निवेदनात प्रशासनाला स्पष्ट इशारा देण्यात आला. “चार दिवसांत वंचित शेतकऱ्यांच्या खात्यात नुकसानभरपाई जमा झाली नाही तर तहसील कार्यालयात अर्धनग्न आंदोलन करण्यात येईल. परिस्थिती बिघडल्यास संपूर्ण जबाबदारी प्रशासनावर असेल.”
या इशाऱ्याने तहसील कार्यालयात खळबळ उडाली. अनेक दिवस धूळ खात पडलेल्या फाईलींना अचानक गती मिळाली. कर्मचाऱ्यांनी तातडीने नावांची पडताळणी सुरू केली आणि अखेर नेवासा तालुक्यातील शेतकऱ्यांच्या खात्यात नुकसानभरपाई जमा होण्याची प्रक्रिया सुरू झाली. मिळालेल्या माहितीनुसार, तालुक्यासाठी १४६ कोटी रुपयांची नुकसानभरपाई मंजूर झाली असून उर्वरित शेतकऱ्यांचे पैसेही टप्प्याटप्प्याने दिले जात आहेत.
या घडामोडीमुळे तालुक्यात समाधानाची भावना आहे. शेतकऱ्यांनी जीवन ज्योत फाऊंडेशनचे आभार मानत त्यांना ‘आवाजाला दिशा देणारे नेतृत्व’ म्हटले आहे. संघटनेच्या सातत्यपूर्ण पाठपुराव्यामुळेच प्रशासन हलले, हे स्पष्टपणे दिसून आले. या पुढाकारात कमलेश नवले पाटील, प्रदेशाध्यक्ष नरेंद्र नवथर, राहुल कांगुणे, अक्षय बोधक, आप्पासाहेब अरगडे, अभिजीत बोधक यांचा सक्रिय सहभाग होता. या टीमने तालुक्यातील शेतकऱ्यांच्या प्रश्नांना सतत बुलंद आवाज दिला. हे यश फक्त नुकसानभरपाईचे पैसे मिळण्यापुरते मर्यादित नसून, शेतकऱ्यांच्या संघर्षाला मिळालेला न्याय आहे.