
फोटो सौजन्य: iStock
विविध सामाजिक उपक्रम राबवण्यात अग्रेसर असलेल्या सौंदाळे (ता. नेवासे) येथील गावकऱ्यांनी आता दररोज संपूर्ण गावेतील प्रत्येकाचा मोबाईल दोन तास बंद ठेवण्याचा उपक्रम सुरु केला आहे. सायंकाळी सहा वाजता गावांतील सार्वजनिक भोंगा वाजल्यानंतर रात्री आठ वाजेपर्यंत मोबाईल बंद असतील. सौंदाळे गावकऱ्यांनी सांगली जिल्ह्यातील मोहित्यांचे वडगावचा आदर्श घेऊन ग्रामसभेतून हा निर्णय घेतला आहे. सायंकाळी ६ ते ८ वाजेपर्यंत गावातील प्रत्येक घरातील मोबाईल बंद ठेवण्याचा निर्णय घेत आहिल्यानगर जिल्ह्यातील सौंदाळे (ता. नेवासे) गावात ३० ऑक्टोबर रोजी हा उपक्रम सुरू करण्यात आला आहे. या विषयावर प्रथम गावांत ग्रामसभा झाली.
सध्याचा सामाजिक विचार केला तर मोबाईलमध्ये रमून गेलेल्या मुलांना अभ्यासाला बसविणे म्हणजे पालकांसाठी एक मोठे कामच बनले आहे. कोरोनाकाळात जवळपास दोन वर्षे मुलं शाळेतच जाऊ शकली नव्हती. त्यामुळे सगळे काही ऑनलाईन असल्यामुळे गावातील सर्वच मुलांच्या हातात बघेल तेव्हा मोबाईल दिसायचा. शालेय आणि महाविद्यालयीन मुले जणू काही या मोबाईलच्या आहारीच गेली होती. या सवयीमुळे आजही घराघरात पालक मुलांच्या या मोबाईल वेडाने पुरते हैराण झाल्याचे दृश्य पहायला मिळत आहे.
या ग्रामसभेत महिलांनी मुलं मोबाईलच्या आहारी गेल्यामुळे त्यांचे अभ्यासाकडे दुर्लक्ष झाल्याने शैक्षणिक गुणवतेबाबत प्रश्न उपस्थित केला. यावर सरपंच शरदराव आरगडे यांनी सायंकाळी ६ ते ८ वाजेपर्यंत गावातील प्रत्येक घरातील मोबाईल बंद ठेवण्याचा निर्णय घेतला. यासाठी सायंकाळी ६ वाजले की गावच्या मंदिरावरील स्पीकरवरून भोंगा वाजवण्याचे ठरले. ठरल्याप्रमाणे गुरुवारपासून (ता. ३०) गावात या उपक्रमाला सुरुवात झाली. लोकनित्युक सरपंच शरदराव आरगडे यांनी सकाळीच स्पीकरवरून ग्रामस्थांना या उपक्रमाची सविस्तर माहिती दिली, त्यानंतर सायंकाळी ६ वाजता भोगा वाजताच गावातील सगळे विद्यार्थी अभ्यासाला बसतात.
इस्लामपूर नगरपालिका निवडणुकीबाबत जयंत पाटलांची मोठी माहिती, म्हणाले; अध्यक्षपदाचा उमेदवार…
सौंदाळेचे सरपंच शरदराव आरगडे यांनी सांगितले, “मोबाईलमुळे कुटुंबातील सवाद संपल्यासारखा झाला आहे. मुलं मोबाईलमध्ये व्यस्त असल्यामुळे त्यांच्या अभ्यासावर परिणाम होत आहे. पुन्हा कुटूंबातील संवाद कायम व्हावा, मुलांना मोबाईलपासून काही तास तरी दुर ठेवता यावे आणि कौटूबिक आपुलकी वाढावी यासाठी आमच्या गावाने दररोज दोन तास मोबाईल बंद ठेवण्यासाठीचा उपक्रम सुरु केला.”